India Pakistan Track 2 talks: भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे २०२५ मध्ये लष्करी संघर्ष झाला होता. त्यानंतर पडद्यामागे कुटनैतिक चर्चा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. नुकतेच श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये दोन्ही देशांच्या राजकीय नेते आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांनी एका ट्रॅक २ च्या चर्चेत सहभागी झाले होते. या बैठकीत सीमेपलिकडून होणारा दहशतवाद आणि दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासारख्या गंभीर मद्द्यांवर चर्चा झाली आहे.
भारत - पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या या पडद्यामागील चर्चेत पाकिस्तानकडून एक व्यक्ती चर्चेसाठी आला होता. पाकिस्तानचे माजी ISI अधिकारी आणि बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांचे चुलते देखील यात सामील झाले होते.
लंडनमधील थिंक टँक इंटरनॅशनल इंस्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज (IISS) कडून कोलंबोमध्ये या आठवड्यात एक क्षेत्रीय सुरक्षा संमेलन आयोजित करण्यात आले होते. हिल्टन कोलंबो हॉटेलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या प्रतिनिधिंनी दीड दिवसात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. या सुरक्षा संमेलनात भारत आणि पाकिस्तान यांच्याशिवाय मालदीव, श्रीलंका आणि ब्रीटनचे प्रतिनिधी देखील सामील झाले होते.
भारताकडून इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष राम माधव सामील झाले होते. ते २०१४ पासून २०२० पर्यंत भाजपचे राष्ट्रीय महासचिव देखील राहिलेले आहेत.
याचबरोबर भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे देखील या संमेलनाला उपस्थित होते. त्यांनी २०१९ ते २०२२ या दरम्यान भारताचे लष्कर प्रमुख म्हणून आपली सेवा बजावली.
रूची घनष्याम या ब्रिटनमध्ये भारताच्या पूर्व राजदूत राहिलाया आहेत. ९० च्या दशकाच्या शेवटी त्या इस्लामाबादमधील उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या पहिल्या महिला डिप्लोमॅट होत्या.
पाकिस्तानकडून या बैठकीसाठी एक सेवेत असलेले डिप्लोमॅट अन् अनेक महत्वाचे चेहरे होते. त्यात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात सेवेत असलेले सज्जाद हैदर खान यांचा समावेश होता. तसेच पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेता आणि माजी मंत्री अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत शेरी रहमान हे देखील या संमेलनाला उपस्थित होते.
निवृत्त मेजर जनरल इस्फंदयार अली खान पटौदी यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयमध्ये देखील काम केलं आहे. विशेष म्हणजे ते बॉलीवूड स्टार सैफ अली खान यांचे काका देखील आहेत.
या ट्रॅक -२ चर्चासत्रात फार मोठं फलित काही हाती लागलेलं नाही. मात्र यावेळी काही संवेदनशील विषयांवर मात्र चर्चा झाली. यात दहशतवाद आणि सीमेपलीकडून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याच्या वाटणीबाबत चर्चा झाली. संकट काळात किंवा आपत्कालीन काळात दोन्ही देशांमध्ये कम्युनिकेशन चांगले करणे, दोन्ही देशांमध्ये भविष्यात तणाव वाढण्यापासून थांबवणे या विषयांवर चर्चा झाली.
या संमेलनादरम्यान, आयआयएसएसकडून एका खास डिनरचे देखील आयोजन करण्यात आले होते. या डिनरमध्ये २१ ते २४ जूनपर्यंत श्रीलंका दौऱ्यावर असणारे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे सहाय्यक सचिव (दक्षिण आणि मध्य आशिया) एस बॉल कपूर देखील सामील झाले होते. काही निवडक भारतीय आणि पाकिस्तानी प्रतिनिधी देखील या डिनरला उपस्थित होते.