पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन-रशिया युद्धात भारताने मध्यस्थी करावी, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच म्हटले होते. पुतीन यांच्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही युक्रेन युद्ध संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे म्हटले आहे. दरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल पुढील आठवड्यात रशियाला जाणार आहेत. ऑक्टोबरमध्ये कझान येथे होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वी BRICS NSA बैठकीत ते सहभागी होतील. यादरम्यान डोवाल रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी चर्चा करू शकतात, अशी माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत झालेल्या फोन संभाषणात चर्चा झाली होती की, त्यांच्या भेटीनंतर पंतप्रधान शांततेशी संबंधित चर्चा करण्यासाठी त्यांचे NSA रशियाला पाठवतील. मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात डोवाल आपल्या रशियन समकक्ष आणि ब्रिक्सच्या इतर सदस्य देशांच्या प्रतिनिधींना भेटतील. यामध्ये जुलैमध्ये मॉस्को शिखर परिषदेत झालेल्या चर्चेच्या आधारे पुढील रणनीती ठरवता येईल. सौदी अरेबिया, यूएई, इराण, इजिप्त आणि इथिओपिया हे नवीन पाच सदस्य देश या गटात सामील झाल्यानंतर प्रथमच ही BRICS NSA बैठक होत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरू आहे. अनेक देशांनी युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वी व्लादिमीर पुतिन यांनीही या प्रदेशात सुरू असलेल्या संकटावर तोडगा काढण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी कबुली दिली होती. इस्तंबूल चर्चेदरम्यान ज्या करारांवर सहमती झाली आणि ज्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही ते भविष्यातील शांतता चर्चेचा आधार बनू शकतात यावर पुतिन यांनी भर दिला. पुतिन यांनी युक्रेन संघर्षावर भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थी करू शकताता असे म्हणाले.