कारगिल युद्धात आमचा सहभाग होता : अखेर पाकिस्‍तानने दिली कबुली

लष्‍कर प्रमुख मुनीर यांच्‍याकडून प्रथमच थेट सहभागाची जाहीर पुष्‍टी
Pakistan Army
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कारगिल युद्धास तब्‍बल २५ वर्षांचा कालावधी झाल्‍यानंतर आता पाकिस्‍तान लष्‍कराने या युद्धातील आपली भूमिका अधिकृतपणे मान्य केली आहे. संरक्षण दिनानिमित्तच्‍या भाषणात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी कारगिल युद्धात आमचा सहभाग होता, अशी कबुली दिली आहे. दरम्‍यान, कारगिल युद्धात थेट लष्करी सहभाग इस्लामाबादने नाकारला होता. घुसखोरांना आणि मुजाहिदीन यांनी हा हल्‍ला केल्‍याचे म्‍हटलं होते. आता कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराने आपल्या थेट सहभागाची जाहीरपणे पुष्टी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काय म्‍हणाले पाकिस्‍तानचे लष्‍कर प्रमुख?

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी म्‍हटलं आहे की, 1948, 1965, 1971 किंवा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्ध किंवा सियाचीनमध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.

मुशर्रफ यांनी कारगिलमधील कारवाईला दिली होती परवानगी

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान दौरा केला. त्‍यांच्‍या या दाैर्‍यानंतर दोन्ही शेजारी देश शांततेच्या दिशेने वाटचाल करू शकतात, असा संदेश जगाला दिला गेला. मात्र पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी विश्वासघात करून कारगिलमधील कारवाईला परवानगी दिली होती. कारगिल युद्धानंतर मुशर्रफ यांनी तत्‍कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पदच्युत करून पाकिस्तानात लष्करी राजवट प्रस्थापित केली.

पाकिस्तानचा झाला होता दारुण पराभव

1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. भारतीय सैनिकांनी लडाखमध्ये सुमारे तीन महिने चाललेल्या लढाईनंतर कारगिल सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील भारतीय बाजूवर घुसखोरांनी व्यापलेल्या स्थानांवर यशस्वीपणे पुन्हा दावा केला होता. हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून भारताने पाकिस्तानवर युद्धात मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना भारताच्‍या 545 जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.

पाकिस्तानी सैन्याच्या सहभागाचे भारताकडे अनेक पुरावे

कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या सहभागाचे अनेक पुरावे भारताकडे आहेत, ज्यात युद्धकैदी, त्यांची वेतन पुस्तके, गणवेश आणि शस्त्रे यांचा समावेश आहे. कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह स्वीकारण्यास पाकिस्तानी लष्कराने नकार दिला होता. कारगिल युद्धानंतर भारतीय लष्कराने अनेक मृत पाकिस्तानी सैनिकांचे दफन केले होते. कारगिल युद्धात पाकिस्तानचे 2700 ते 4000 सैनिक मारले गेल्याचे मानले जाते. त्यावेळी कारगिल युद्धामुळे मुत्सद्देगिरीच्या पातळीवर पाकिस्तानला मोठा धक्का बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news