पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान.  
आंतरराष्ट्रीय

Imran Khan | इम्रान खान यांची ८५ टक्‍के दृष्टी गेली; सुप्रीम कोर्टातील माहितीने पाकिस्तानात खळबळ

सर्वोच्च न्यायालयाचे तातडीने वैद्यकीय पथक नेमण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Imran Khan vision loss

इस्लामाबाद: माजी पंतप्रधान आणि 'पीटीआय' पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत समोर आलेल्या एका धक्कादायक वृत्ताने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. दीर्घकाळापासून रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात बंदिस्त असलेल्या इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी ८५ टक्क्यांपर्यंत निकामी झाली आहे, असा दावा त्‍यांच्‍या पक्षाच्‍या वतीने करण्‍यात आला आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने खान यांच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी एक विशेष वैद्यकीय पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात इम्रान खान यांच्या तुरुंगातील स्थितीबाबत सुनावणी पार पडली. यावेळी सादर करण्यात आलेल्या एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. ऑक्टोबर २०२५ पर्यंत खान यांची दृष्टी सामान्य होती, मात्र त्यानंतर त्यांना धूसर दिसू लागले. उपचारांमधील दिरंगाईमुळे ही स्थिती अधिक खालावली. तपासणीदरम्यान डोळ्यात रक्ताची गुठळी झाल्याचे निदान झाले. इंजेक्शनद्वारे उपचार करूनही त्यांची दृष्टी पूर्ववत होऊ शकलेली नाही, असा दावा त्‍यांच्‍या पक्षाच्‍या वतीने करण्‍यात आला आहे.

कैद्याला योग्‍य उपचार मिळणे सरकारची जबाबदारी

पाकिस्तानचे सरन्यायाधीश (CJP) याह्या आफ्रिदी आणि न्यायमूर्ती शाहिद बिलाल हसन यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी घेतली. "कैद्याचे आरोग्य ही राज्याची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्याला योग्य उपचार मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे," असे स्पष्ट मत सरन्यायाधीशांनी नोंदवले.

इम्रान खान यांना त् मुलांशी दूरध्वनीवरून संवाद साधण्याची परवानगी

न्यायालयाने केवळ वैद्यकीय उपचारांचेच नव्हे, तर इम्रान खान यांना त्यांच्या मुलांशी दूरध्वनीवरून संवाद साधण्याची परवानगी देण्याचेही निर्देश दिले आहेत. हे दोन्ही आदेश १६ फेब्रुवारीपूर्वी (सोमवार) अंमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अटॉर्नी जनरल मन्सूर उस्मान अवान यांनी न्यायालयात ग्वाही दिली की, "वैद्यकीय सुविधा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि जर कैदी समाधानी नसेल, तर सरकार योग्य ती पावले उचलेल."

पाकिस्‍तान सरकारने सर्व दावे फेटाळले

इम्रान खान यांनी वारंवार डोळ्यांच्या त्रासाची तक्रार करूनही तुरुंग प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी मात्र खान यांच्या कुटुंबीयांकडून पसरवले जाणारे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT