प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo.
आंतरराष्ट्रीय

energy crisis warning | "१९७० मधील ऊर्जा संकटापेक्षाही भीषण परिस्थिती!" : IEA संचालकांनी नेमका कोणता इशारा दिला?

इराणला दिलेला ४८ तासांचा अल्टिमेटम संपत असतानाच ट्रम्प यांची नवी घोषणा "सामर्थ्यातून शांतता"

पुढारी वृत्तसेवा

IEA energy crisis warning

वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील परिस्थिती "अत्यंत गंभीर" असून ती १९७० च्या दशकातील दोन ऊर्जा संकटांच्या एकत्रित परिणामापेक्षाही भयानक आहे, असा इशारा आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे (IEA) कार्यकारी संचालक फॅतिह बिरोल यांनी दिला आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी सोमवारी "सामर्थ्यातून शांतता" अशी घोषणा केली. इराणला दिलेला ४८ तासांचा अल्टिमेटम संपत असताना ट्रम्प यांनी अत्यंत कडक शब्दांत हा इशारा दिला आहे. 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद करण्याची धमकी तेहरान सरकारने दिली होती, त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. "ट्रम्प, यू आर फायर्ड!", असे म्हणत इराणने ट्रम्प यांच्या नव्या घोषणेची खिल्ली उडवली आहे.

संकटावर सर्वात मोठा उपाय म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणे

ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल प्रेस क्लबला संबोधित करताना बिरोल म्हणाले की, पश्चिम आशियातील परिस्थिती "अत्यंत गंभीर" असून ती १९७० च्या दशकातील दोन ऊर्जा संकटांच्या एकत्रित परिणामापेक्षाही भयानक आहे. परिस्‍थिती अशीच राहिली तर मोठ्या ऊर्जा संकटाला सामोरे जावे लागेल. सध्याच्या संकटावर सर्वात मोठा उपाय म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा उघडणे हाच आहे. अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने हा मार्ग प्रभावीपणे रोखून धरला आहे.

"सामर्थ्यातून शांतता... ट्रम्प यांची नवी घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी सोमवारी "सामर्थ्यातून शांतता" अशी घोषणा केली. इराणला दिलेला ४८ तासांचा अल्टिमेटम संपत असताना ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद करण्याची धमकी तेहरान सरकारने दिली होती, त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

"ट्रम्प, यू आर फायर्ड!" : इराणच्‍या अधिकार्‍याने उडवली ट्रम्प यांची खिल्ली

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC) च्या एका अधिकाऱ्याने डोनल्ड ट्रम्प यांच्या अल्टिमेटमची खिल्ली उडवली. ट्रम्प यांच्याच प्रसिद्ध वाक्याचा वापर करत प्रवक्त्याने म्हटले, "हे पहा ट्रम्प, तुमची हकालपट्टी झाली आहे. तुम्हाला या वाक्याची चांगलीच ओळख असेल. या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद."

युद्धाचा चौथा आठवडा: परिस्थिती अधिक स्फोटक

युद्धाच्या चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच या घडामोडींनी संघर्षाला एका धोकादायक वळणावर नेऊन ठेवले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे डोनल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतून मोठा दबाव येत आहे. या युद्धात आतापर्यंत इराणमध्ये १,५०० हून अधिक, लेबनॉनमध्ये १,००० हून अधिक, इस्रायलमध्ये १५ आणि अमेरिकेचे १३ लष्करी जवान तसेच आखाती प्रदेशातील अनेक नागरिक मारले गेले आहेत. लेबनॉन आणि इराणमधील लाखो लोक विस्थापित झाले आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता

इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील जहाज वाहतूक आणि उत्पादनात अडथळे येत असल्याने रविवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी अस्थिरता दिसून आली. रविवारी संध्याकाळी शिकागो मर्कंटाइल एक्सचेंजवर व्यापाराला सुरुवात झाली तेव्हा अमेरिकन क्रूडच्या (WTI) किमतीत क्षणिक वाढ झाली, परंतु नंतर ती ९७.८६ डॉलरवर स्थिरावली. आंतरराष्ट्रीय मानक असलेल्या ब्रेंट क्रूडची किंमत रविवारी १११ डॉलरच्या वर होती. गेल्या आठवड्यात ही किंमत ११९.५० डॉलरपर्यंत पोहोचली होती. युद्ध सुरू झाले तेव्हा ब्रेंट क्रूड प्रति बॅरल सुमारे ७० डॉलर होते, जे आता गगनाला भिडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT