Trump on India-Pakistan conflict
नवी दिल्ली/वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त दावा करत सांगितले की, मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेला चार दिवसांचा युद्धजन्य संघर्ष त्यांनी; थांबवला आणि त्यासाठी “व्यापारी करार” वापरला.
ट्रम्प म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान हे दोन अण्वस्त्रधारी देश एकमेकांवर हल्ले करत होते. मी दोन्ही देशांना सांगितलं, जर व्यापार हवा असेल तर युद्ध थांबवा. पाच लढाऊ विमानं पाडली गेली होती.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांत अनेक वेळा हे दावे केले आहेत की त्यांनी भारत-पाक संघर्ष थांबवला. मात्र त्यांच्या दाव्यांना कोणताही अधिकृत पुरावा नाही. भारत सरकारने या दाव्यांवर पुनःपुन्हा स्पष्ट भूमिका मांडली आहे की, कोणतीही मध्यस्थी झाली नाही.
भारताने मात्र ट्रम्प यांचे दावे स्पष्टपणे फेटाळले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी याबाबत सांगितले की, "भारताने कधीच कोणत्याही मध्यस्थीला मान्यता दिली नाही, न देईल. भारत आणि पाकिस्तानमध्ये 'समझौता' थेट लष्करी चॅनेल्समार्फत पाकिस्तानच्या विनंतीवरून झाली."
22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर 7 मे रोजी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केलं.
पाकिस्तानने याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्करी व नागरी भागांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. मात्र भारताने बहुतांश ड्रोन पाडले.
10 मे रोजी पाकिस्तानकडून भारतावर क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला, त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या अनेक एअरबेसवर निशाणा साधला.
त्याच दिवशी पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधून संघर्ष थांबवण्याची विनंती केली आणि एलओसी व आंतरराष्ट्रीय सीमेवर 'समजुता' झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट सांगितले की, "ऑपरेशन सिंदूर' केवळ थांबवण्यात आले आहे, संपवलेले नाही. भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला ‘युद्धजन्य कृत्य’ म्हणून पाहिला जाईल आणि त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल."