इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील एका गावावर 'व्हाईट फॉस्फरस'चा मारा केल्याचा गंभीर आरोप मानवाधिकार संघटना 'ह्युमन राइट्स वॉच'ने (HRW) केला आहे. 
आंतरराष्ट्रीय

Israel white phosphorus attack | भयंकर..! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये 'पांढरा फॉस्फरस'चा वापर, 'ह्युमन राइट्स वॉच'चा गंभीर आरोप

Israel white phosphorus attack |आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार 'पांढरा फॉस्फरस'चा वापर वस्तीत करणे अत्यंत धोकादायक आणि वादग्रस्त मानले जाते

पुढारी वृत्तसेवा

  • व्हाईट फॉस्फरस हवेच्या संपर्कात येताच प्रचंड उष्णतेसह जळू लागतो

  • मानवी शरीराच्या संपर्कात आल्यास हाडांपर्यंत खोलवर जखमा करतो

  • यापूर्वीही अनेकदा दक्षिण लेबनॉनमध्ये व्हाईट फॉस्फरसचा वापर झाल्याच्या नोंदी

Israel white phosphorus attack

बैरूत: इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील एका गावावर 'व्हाईट फॉस्फरस'चा मारा केल्याचा गंभीर आरोप मानवाधिकार संघटना 'ह्युमन राइट्स वॉच'ने (HRW) केला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा रासायनिक पदार्थ मानवी वस्तीत वापरणे अत्यंत धोकादायक आणि वादग्रस्त मानले जाते.

निवासी भागात तोफखान्याचा मारा

ह्युमन राइट्स वॉचने सात छायाचित्रांची तांत्रिक पडताळणी केली. यानंतर असा निष्कर्ष काढला आहे की, दक्षिण लेबनॉनमधील योहमोर गावातील निवासी भागात इस्रायलने व्हाईट फॉस्फरसयुक्त गोळ्यांचा वापर केला. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर काही तास आधीच इस्रायली लष्कराने स्थानिकांना गाव रिकामे करण्याचा इशारा दिला होता. मात्र, या हल्ल्याच्या वेळी गावात नागरिक उपस्थित होते का किंवा कोणाला इजा झाली का, याची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकलेली नाही.

'व्हाईट फॉस्फरस' इतका भयंकर का?

दाट लोकवस्तीच्या भागात व्हाईट फॉस्फरसचा वापर करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन आहे. हा रासायनिक पदार्थ हवेच्या संपर्कात येताच प्रचंड उष्णतेसह जळू लागतो, ज्यामुळे इमारतींना आग लागू शकते. हा पदार्थ मानवी शरीराच्या संपर्कात आल्यास हाडांपर्यंत खोलवर जखमा करतो. किरकोळ भाजले तरी संसर्ग होणे, शरीरातील अवयव निकामी होणे किंवा श्वसनाचे गंभीर विकार होण्याचा धोका असतो.

मानवाधिकार संघटनांकडून चिंता व्यक्त

ह्युमन राइट्स वॉचचे लेबनॉनमधील संशोधक रामजी काइस यांनी म्हटले की, "निवासी भागांवर अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वापर करणे अत्यंत चिंताजनक असून यामुळे नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो."

इस्रायलच्या लष्कराचे मौन

दरम्यान, या आरोपांवर इस्रायली लष्कराने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यापूर्वी अशाच आरोपांना उत्तर देताना इस्रायलने म्हटले होते की, ते व्हाईट फॉस्फरसचा वापर केवळ 'स्मोक स्क्रीन' (धुराचे पटल) तयार करण्यासाठी करतात, नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी नाही. दरम्यान, ह्युमन राइट्स वॉच आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनांच्या मते, इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्षादरम्यान यापूर्वीही अनेकदा दक्षिण लेबनॉनमध्ये व्हाईट फॉस्फरसचा वापर झाल्याच्या नोंदी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT