SpaceX Starship Starbase explosion Elon Musk reaction
बोका चिका, टेक्सास : इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या स्टारशिप प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे. "स्टारशिप शिप 36" या यानाचा स्फोट बुधवारी रात्री 11 वाजता झाला. जेव्हा यानाच्या सहा ‘रॅप्टर’ इंजिनांची स्टॅटिक फायर टेस्ट घेण्याची तयारी सुरू होती, तेव्हा हा स्फोट झाला.
या स्फोटात संपूर्ण यान नष्ट झाले असून स्फोटाच्या तीव्रतेमुळे आकाशात मोठी ज्वाला उसळली आणि परिसरात भूकंपासारखी हालचाल जाणवली. प्रत्यक्षदर्शींनी शूट केलेल्या व्हिडिओंमध्ये टेस्ट स्टँडवरून उठणारी प्रचंड आग आणि हवेत उडणारे तुकडे स्पष्टपणे दिसून आले.
या स्फोटानंतर लगेचच स्पेसएक्सने एक निवेदन जारी करत सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती दिली. त्यांनी आधीच सुरक्षा परिघ तयार केला होता आणि स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर मिळून परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना दिलासा दिला असून, सध्या कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
स्फोटानंतर, इलॉन मस्क यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर अत्यंत हलक्याफुलक्या शब्दांत प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, – “Just a scratch”, म्हणजेच "फक्त खरचटलं!" ही प्रतिक्रिया इलॉन यांच्या धाडसी आणि अपयशातून शिकण्याचा दृष्टिकोन दाखवून देते.
स्पेसएक्स कंपनी नेहमीच अपयशांमधून शिकत नव्या प्रयोगांची तयारी करत असते. त्यांनी याआधी अनेक वेळा यशस्वी आणि अपयशी चाचण्या केल्या आहेत, ज्यामुळे तांत्रिक सुधारणा आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक ती तयारी करता आली आहे.
स्टारशिप ही स्पेसएक्सच्या अंतराळ मोहिमांचा केंद्रबिंदू आहे. याच यानाच्या माध्यमातून भविष्यात चंद्रावर आणि मंगळावर मानवी मोहिमा राबवण्याचे उद्दिष्ट आहे. याची दहावी उड्डाण चाचणी 29 जून रोजी होण्याची शक्यता होती. मात्र या स्फोटामुळे आता ती पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
सध्या स्पेसएक्सने तपासणी सुरू केली असून स्फोटाचे नेमके कारण शोधले जात आहे. यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा करून पुन्हा चाचण्या घेतल्या जातील.
याआधीही SpaceX च्या Starship लॉन्च प्रणालीला मोठा झटका बसला होता, जेव्हा सुपर हेवी बूस्टर आणि Starship यान दोघेही चाचणी उड्डाणादरम्यान स्फोट झाले — एलोन मस्कच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमासाठी ही सलग तिसरी अपयशी चाचणी ठरली.
ही मानवरहित चाचणी उड्डाण सुमारे 400 फूट उंच असलेल्या यानाच्या नऊव्या उड्डाणाची होती. यापूर्वी जानेवारी आणि मार्च महिन्यांत अशाच प्रकारच्या अयशस्वी चाचण्या झाल्या होत्या.
SpaceX च्या वेबसाईट आणि सोशल मीडियावर दाखवलेल्या थेट प्रक्षेपणानुसार, पहिल्या टप्प्यातील Super Heavy बूस्टर उड्डाणानंतर लगेचच स्फोट झाला. दुसऱ्या टप्प्यातील Starship यानात उड्डाणादरम्यान इंधनगळती झाली, ते नियंत्रणाबाहेर गेले आणि पुन्हा पृथ्वीवर येताना तुटून पडले.
या अपयशांनंतरही SpaceX चाचण्या सुरू ठेवत आहे आणि प्रत्येक उड्डाणातून महत्त्वपूर्ण डेटा मिळतो, जो भविष्यातील सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरतो, असे कंपनीचे म्हणणे आहे.