How US-Israel Targeted Khamenei: Iran Attack Explained
वॉशिंग्टन डीसी : तंत्रज्ञान, इराणमध्ये काम करणारे गुप्तहेरांचं जाळं, समन्वय आणि शिस्तबद्ध नियोजन.... अमेरिका- इस्रायलच्या संयुक्त मोहिमेचं वर्णन करायचं झालं तर ही चार शब्द पुरेशी आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा शनिवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर इराणमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे असले तरी ही मोहीम अमेरिका- इस्रायलने कशी पार पडली, याची तयारी कधीपासून सुरु होती याची माहिती आता समोर आली आहे.
खामेनींची एकच चूक महागात पडली
गेल्यावर्षी जूनमध्ये इराण- इस्रायल युद्धात इराणच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल वापरल्याने इस्रायलला इत्यंभूत माहिती मिळत होती.
शनिवारीही तेच घडलं. शनिवारी इराण लष्कर- गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या कार्यालयात बैठकीसाठी येणार असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली होती. या बैठकीत खामेनीही उपस्थित असतील, असंही समजलं होतं.
इराणवर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या अमेरिका- इस्रायलच्या संयुक्त पथकाला ही माहिती पुरेशी होती. ऐरवी खामेनी यांचा दौरा, निवासस्थान याबद्दलची प्रचंड गोपनीयता असायची. पण शनिवारी खामेनी बैठकीसाठी कार्यालयात येणार हे शत्रूराष्ट्रांपर्यंत पोहोचलं होतं.
न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, तंत्रज्ञानाची मदत, डेटा विश्लेषण आणि गुप्तहेराचं इराणमधील जाळं यामुळे अमेरिका- इस्रायलपर्यंत ही माहिती पोहोचली असावी.
इराणमध्ये गुप्तहेराचं जाळ उभं करणंही सोपं होतं. कारण इराणमधील बरेच तरुण हे सत्ताधाऱ्यांवर नाराज होते, त्यांच्या मनात चिड होती आणि यातूनच गुप्तहेराचं जाळं उभं करणं अमेरिकेसारख्या देशांसाठी सोपं झालं.
फायनान्शिअल टाइम्स या वृत्तपत्रानुसार, अमेरिकेने गुप्तहेरामार्फत खामेनी कार्यालयात पोहोचल्याची खातरजमा केली. दुसरीकडे इस्रायलच्या यंत्रणेने इराणमधील विशेषत: तेहरानमधील रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केले होते.
'आम्हाला इस्रायलयमधील गल्लीबोळा पाठ आहेत तसंच इराणमधील रस्तेही माहिती आहेत. आम्ही वर्षानुवर्षे इराणमधील कॅमेरे हॅक करुन पाळत ठेवतोय', असे इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी 'FT'ला सांगितले. खामेनींचा जिथे मृत्यू झाला त्या कार्यालयाच्या पार्किंग परिसरात एक कॅमेरा होता या कॅमेऱ्यावरुन खामेनी कार्यालयात पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
अशी होती मोहीम
वेळेत पोहोचण्यासाठी इस्रायलची लढाऊ विमान हवेत झेपावली होती. खामेनी, इराणमधील प्रक्षेपणास्त्र (Ballestic Missile) आणि लष्करी तळे हे त्यांचे लक्ष्य होते. एकीकडे खामेंनीवर हल्ला करताच लढाऊ विमानांच्या एका पथकाने जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या तळांना नष्ट केले. या लष्करी तळांवर तेहरानच्या हवाई सुरक्षेची जबाबदारी होती. या अचूक नियोजनामुळे रविवारी दुपारपर्यंत इराणच्या हवाई हद्दीवर अमेरिका- इस्रायलच्या हवाई दलाने नियंत्रण मिळवले, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.
CNN च्या वृत्तानुसार, अमेरिका- इस्रायलच्या यंत्रणा गेल्या कित्येक महिन्यांपासून खामेंनींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होत्या. 'योग्य वेळ' येताच मोहीम राबवायची असं ठरलं होतं. खामेनींचा दिनक्रम काय होता, ते काय जेवत होते, ते कुठे रहायचे, साथीदारांच्या संपर्कात कसे रहायचे याची माहिती मिळवली जात होती.
रात्री, मध्यरात्री बैठका घेण्याऐवजी सकाळी लवकर बैठक घेतल्यास शत्रूराष्ट्रांच्या रडारवर येणार नाही, असा (अति) आत्मविश्वास खेमानींना असावा, असं इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी CNN ला सांगितले.
रात्रीऐवजी दिवसा राबवलेली मोहीम
सहसा अमेरिका- इस्रायलने राबवलेल्या मोहिमा या रात्रीच्या अंधारातल्या होत्या. पण इराणमध्ये मोहीम दिवसाढवळ्या राबवली जाणार होती. लढाऊ विमानातील सर्व वैमानिकांना त्यानुसार तयारी करण्यास सांगितले होते. लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, अत्याधुनिक आणि अचूक मारा करणारी युद्धसामग्री त्यांच्या लढाऊ विमानात होती. अवघ्या 60 सेकंदांमध्ये ऑपरेशन खामेनी पार पडलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
खामेनींनी बैठक का बोलावली होती?
शत्रूराष्ट्रांच्या कारवायांमुळे इराणचे सर्व वरिष्ठ लष्करी अधिकारी हे एकाच वेळी खामेनींना भेटणं टाळायचे. पण शनिवारी तसं नव्हतं. खामेनींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचं ठरवलं होतं. ही बैठक का बोलावण्यात आली, बैठकीत कशावर चर्चा होणार होती हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या बैठकीची टीप अमेरिकेपर्यंत कोणी पोहोचवली हे अजूनही गुलदस्त्यात आहे आणि भविष्यातही ते उजेडात येण्याची शक्यता नाही.
इस्रायलची पहिलीच मोहीम
इस्रायलने शत्रूराष्ट्रातील लष्करी अधिकाऱ्यांना संपवण हे नवीन नव्हतं. पण एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला ठार मारणं हे इस्रायलच्या इतिहासातील पहिलीच लष्करी मोहीम आहे.
सौदी अरेबियाचं कनेक्शन
सौदी अरेबियाचंही या हल्ल्यात कनेक्शन असल्याचे 'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिले आहे. सौदी अरेबियाचे राजपूत्र (Crown Prince) मोहम्मद बिन सलमान आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू या दोघांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हल्ल्यात सहभागी होण्यासाठी राजी केले. सौदी आणि इस्रायल यांचे संबंध तसे जिव्हाळ्याचे नाही पण 'शत्रूचा शत्रू हा मित्र' अमेरिका- इस्रायल- सौदी अरेबियाच्या बाबत म्हणता येईल.
जानेवारीमध्ये नेत्यानाहू यांनी ट्रम्पपर्यंत इराणच्या लष्करी तळ, क्षेपणास्त्र निर्मिती, अणूप्रकल्प याबाबतची माहिती पोहोचवली होती. इराणने पुन्हा अणूप्रकल्पाची बांधणी सुरू केल्याचे सांगण्यात आले. पण ट्रम्प यांनी त्यावेळी हल्ल्यास नकार दिला. अमेरिकेकडे इराणकडील लष्करी क्षमतेची सुधारित माहिती नसल्याने ट्रम्प यांनी नकार दिल्याचे अमेरिकेतील माध्यमांनी म्हटले आहे. त्याच सुमारास इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलनाने उग्ररुप धारण केलं आणि खामेनींविरोधातील मोहिमेनं वेग धरला, असा दावाही या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
200 विमानांचा हल्लाबोल
इस्रायलने शनिवारच्या हवाई हल्ल्यांसाठी वायूदलातील सर्व लढाऊ विमानं पाठवण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. यापूर्वी 1967 मध्ये इस्रायलने इजिप्तच्या हवाई दलाविरोधात आपली सर्व म्हणजे 12 विमानं पाठवली होती. यावेळीही इस्रायलने तसंच केलं. या मोहीमेसाठी तब्बल 200 विमान तैनात होती. मध्य आणि पश्चिम इराणवर इस्रायली विमानांनी हल्लाबोल केला. तर अर्धा तासानंतर अमेरिकेच्या विमानांनी पूर्व इराणच्या दिशेने हल्ले केले. पूर्व इराण हा भाग इस्रायलपासून लांब आहे पण अमेरिकेच्या लष्करी तळांपासून हा भाग जवळ आहे.