OpenAI CEO Sam Altman  Pudhari
आंतरराष्ट्रीय

ChatGPT energy consumption | एका ChatGPT क्वेरीसाठी किती उर्जा आणि पाण्याचा वापर होतो? सॅम ऑल्टमन यांचा मोठा खुलासा

ChatGPT energy consumption | 2035 पर्यंत हाय-एनर्जी फिजिक्सचे कोडे सुटेल, अंतराळ वसाहतींची सुरुवात होईल...

Akshay Nirmale

ChatGPT energy consumption Sam Altman Environmental impact of AI

ऑनलाईन डेस्क : Artificial Intelligence (AI - कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या वापरामुळे वाढणाऱ्या पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त होत असताना, OpenAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी ChatGPT वापरल्याने होणाऱ्या ऊर्जेच्या आणि पाण्याच्या वापराबाबत नव्या माहितीचा खुलासा केला आहे.

11 जून रोजी 'The Gentle Singularity' या शीर्षकाने प्रकाशित केलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये ऑल्टमन यांनी याबाबत माहिती दिली आहे.

इतक्या वीज आणि पाण्याचा वापर...

सरासरी एका ChatGPT क्वेरीसाठी 0.34 वॉट-तास (watt-hours) ऊर्जा (वीज) वापरली जाते. अशी माहिती त्यांनी दिली आहे. एखादा ओव्हन एक सेकंदात जितकी उर्जा वापरतो किंवा उच्च कार्यक्षमतेचा बल्ब काही मिनिटांत जितकी वीज वापरतो तितकीच ही उर्जा आहे.

विशेष म्हणजे पाण्याचा वापरही तितकाच क्षुल्लक आहे. एका क्वेरीसाठी सुमारे 0.000085 गॅलन पाणी लागते, म्हणजेच अंदाजे एक- पंधरावा चमचा.

वाढती ऊर्जा वापराची चिंता

AI तंत्रज्ञान प्रचंड वेगाने विकसित होत असतानाच, त्याच्या पर्यावरणीय परिणामांचीही चर्चा वाढली आहे. काही तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, लवकरच AI चा ऊर्जा वापर क्रिप्टोकरन्सी माईनिंगइतका किंवा त्याहून अधिक होऊ शकतो.

सॅम ऑल्टमन म्हणतात, “ChatGPT आज जगभरात लाखो लोक वापरत आहेत आणि तेही अधिकाधिक महत्त्वाच्या कामांसाठी. त्यामुळे त्यातील लहानशी सकारात्मक सुधारणा प्रचंड फायदा देऊ शकते, पण तितकीच लहानशी चूक देखील मोठा नकारात्मक परिणाम करू शकते.”

ऊर्जा आणि बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल

ब्लॉगमध्ये ऑल्टमन यांनी 2030च्या दशकात ऊर्जा आणि बुद्धिमत्ता प्रचंड प्रमाणात उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणतात, "बुद्धिमत्ता आणि ऊर्जा — हेच दोन घटक मानव प्रगतीसाठी मुख्य अडथळे राहिले आहेत. एकदा का हे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले, तर चांगल्या शासकीय व्यवस्थेसह आपण काहीही साध्य करू शकतो."

AI वापराचा खर्च जलदगतीने कमी होत आहे...

AI चा आर्थिक बाजूने विचार करताना ऑल्टमन यांनी नमूद केलं की, AI वापरण्याचा खर्च दरवर्षी 10 पट कमी होत आहे. त्यांनी GPT-4 पासून GPT-4o पर्यंतच्या प्रवासाचा संदर्भ देत सांगितलं की, फक्त एका वर्षात टोकन किमतीत 150 पट घट झाली आहे.

ते पुढे म्हणाले, “मूर्स लॉनुसार तंत्रज्ञानात 18 महिन्यांत 2 पट सुधारणा होत होती; पण AI मध्ये ती गती त्यापेक्षा कितीतरी पटीने वेगवान आहे.”

2035 पर्यंत आश्चर्यकारक गोष्टी समोर येतील...

AI च्या भविष्यातील संधींवर बोलताना ते म्हणतात, "2035 पर्यंत आपण इतक्या आश्चर्यकारक गोष्टी शोधून काढू शकतो, की आज त्याची कल्पनाही करता येणार नाही. कदाचित एका वर्षी हाय-एनर्जी फिजिक्सचे कोडे सुटेल आणि दुसऱ्या वर्षी आपण अंतराळ वसाहतींची सुरुवात करु."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT