Sex Warfare Silicon Valley file photo
आंतरराष्ट्रीय

Sex Warfare Silicon Valley: सिलिकॉन व्हॅलीत 'सेक्स वॉरफेअर'! बड्या अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवतात 'सुंदरी', पण कारण काय?

प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, लग्न करून मुलंही जन्माला घालतात; सुंदर महिलांच्या मदतीने अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत चीनी-रशियन एजंट्सची घुसखोरी!

मोहन कारंडे

Sex Warfare Silicon Valley

वॉशिंग्टन : चीन आणि रशियाच्या महिला गुप्तहेरांनी अमेरिकेच्या 'सिलिकॉन व्हॅली'मध्ये घुसखोरी करण्यासाठी 'सेक्स वॉरफेअर' (Sex Warfare) नावाच्या एका अत्यंत धोकादायक आणि दीर्घकालीन हेरगिरी मोहिमेला सुरुवात केली आहे, असा खळबळजनक दावा 'द टाइम्स'ने आपल्या एका अहवालात केला आहे. या महिला गुप्तहेर अमेरिकेच्या उच्चपदस्थ अभियंते, संशोधक आणि अधिकाऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करत देशाचे गोपनीय तंत्रज्ञान चोरत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

काय आहे 'सेक्स वॉरफेअर'?

'सेक्स वारफेअर' म्हणजे संवेदनशील डेटा मिळवण्यासाठी किंवा लक्ष्य असलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी हेतुपुरस्सरपणे शारीरिक संबंधांचा वापर करणे. आजच्या तंत्रज्ञान युगात हेरगिरीची ही जुनी युक्ती अधिक धोकादायक ठरत आहे.

प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, लग्न करून मुलंही जन्माला घालतात

चीनी आणि रशियन गुप्तचर यंत्रणा सुंदर महिलांचा वापर करून अमेरिकेतील महत्त्वाच्या टेक कंपन्यांमध्ये घुसखोरी करत आहेत. या महिला कर्मचाऱ्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून (हनीट्रॅप) व्यावसायिक गुप्त गोष्टी आणि संवेदनशील डेटा चोरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुप्तचर संस्थांकडून प्रशिक्षित असलेल्या या महिला अनेकदा आपल्या लक्ष्यासोबत दीर्घकाळ शारीरिक संबंध जोडतात आणि माहिती मिळवण्यासाठी त्यांच्याशी लग्नही करतात. अनेक प्रकरणांमध्ये, या महिलांनी मुले देखील जन्माला घातली आहेत. यामुळे त्या त्यांच्या वैयक्तिक जीवनात खोलवर रुजल्या आहेत आणि वर्षानुवर्षे हेरगिरी करत आहेत.

शीतयुद्धातील युक्तीचे अत्याधुनिक रूप

सध्याच्या आणि माजी अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रोमान्स, मोह आणि मानसिक बदल' यांचा वापर करून ही ऑपरेशन चालवली जातात. एका माजी अधिकाऱ्याने 'द टाईम्स'ला सांगितले की, "एखाद्याला गाठणे, त्याच्याशी लग्न करणे, त्याच्यासोबत मुले जन्माला घालणे आणि आयुष्यभर माहिती गोळा करण्याचे काम करणे, हे अत्यंत भयानक आहे आणि ही पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे."

अफेअर ते कुटुंबापर्यंतची योजना

या अहवालात एका रशियन महिलेचे उदाहरण दिले आहे, जिने अमेरिकेच्या संरक्षण-संबंधित प्रकल्पांवर काम करणाऱ्या एका एरोस्पेस इंजिनिअरशी विवाह केला. मॉडेलिंग अकादमी आणि 'रशियन सॉफ्ट-पॉवर स्कूल'मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ती महिला अमेरिकेच्या लष्करी-अंतराळ क्षेत्रातील क्रिप्टोकरन्सी तज्ज्ञ म्हणून पुन्हा समोर आली. विशेष म्हणजे, तिच्या पतीला तिच्या खऱ्या हेरगिरीच्या पार्श्वभूमीची जराही कल्पना नव्हती.

जगभरात महिला गुप्तहेरांच्या ऑपरेशन्सची ही पहिली घटना नाही. यापूर्वी, यूकेच्या अधिकाऱ्यांनी जर्मनीत रशियन हेरगिरी गटाचा पर्दाफाश केला होता, तसेच इस्रायलच्या 'मोसाद'कडूनही महिला एजंट्सचा वापर केल्याची माहिती उघड झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT