US Iran tensions
नवी दिल्ली/तेहरान : अमेरिका आणि इस्रायलने इराणची नाकेबंदी करण्याची तयारी सुरू केलेली असतानाच, इराणने भारताबाबत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून भारतीय जहाजांच्या वाहतुकीबाबत इराणचे केंद्र सरकारशी 'सकारात्मक संबंध' असल्याचे इराणने म्हटले आहे.
भारतातील इराणचे राजदूत डॉ. मोहम्मद फताली यांनी स्पष्ट केले की, "भारतीय जहाजांच्या संदर्भात आमचे भारत सरकारशी अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. आमच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचा उल्लेख इराणच्या पाच प्रमुख मित्र राष्ट्रांमध्ये केला आहे. त्यामुळे भारतीय जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत." अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर इराणची ही भूमिका भारतासाठी दिलासादायक मानली जात आहे.
तुर्कीने होर्मुझच्या समुद्रधुनीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी सांगितले की, "या जलमार्गावर आंतरराष्ट्रीय सशस्त्र सैन्य तैनात करणे अधिक अडचणीचे ठरेल. मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच हा मार्ग खुला व्हायला हवा. अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर फिदान यांनी ही प्रतिक्रिया दिली असून, कोणत्याही देशाला या युद्धाचा विस्तार नको असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शांतता कराराचा भाग म्हणून इराणमधील समृद्ध युरेनियमचा (Enriched Uranium) साठा स्वतःकडे घेण्याची तयारी रशियाने दर्शवली आहे. रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, "राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी हा प्रस्ताव अमेरिका आणि इतर प्रादेशिक देशांसमोर आधीच ठेवला आहे. अमेरिकेने होर्मुझच्या समुद्रधुनीची नाकेबंदी करण्याच्या दिलेल्या धमकीवर रशियाने टीका केली असून, यामुळे जागतिक बाजारपेठेवर विपरीत परिणाम होईल, असा इशारा दिला आहे.
अमेरिकन युद्धनौका नाकेबंदी करण्यासाठी सज्ज होत असतानाच, इराणशी संबंधित दोन तेलवाहू जहाजांनी सोमवारी होर्मुझची समुद्रधुनी ओलांडली. 'ऑरोरा' आणि 'न्यू फ्युचर' अशी या जहाजांची नावे असून ती इराणची तेल उत्पादने आणि डिझेल घेऊन जात असल्याचे 'केपलर'च्या आकडेवारीतून समोर आले आहे.