पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. हिजबुल्लाहने सोमवारी रात्री उशिरा इस्रायलच्या उत्तर भागात (Hezbollah- Israel Attack) सुमारे १९० रॉकेट्स डागली. यात एका चिमुकल्यासह ७ जण जखमी झाले. हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमधील बि'इना, कर्मीइल आणि हैफासह अनेक शहरांना लक्ष्य केले. त्यांनी गॅलिली प्रदेशात ५० रॉकेट्सनी हल्ला केला. उत्तर अरब शहर बि'इना येथे श्रापनेल धडकल्यानंतर एक महिला आणि एका मुलासह तिघे जखमी झाले. त्यांनी उपचारासाठी वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले.
हिजबुल्लाहच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचा एक व्हिडिओ इस्रायलच्या संरक्षण दलाने (Israel Defense Forces) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले आहे की ''उत्तर इस्रायलवर हल्ला झाला आहे. हिजबुल्लाहच्या आक्रमणाविरुद्ध आम्ही आमच्या नागरिकांचे रक्षण करत राहू”.
दरम्यान, हिजबुल्लाहने या रॉकेट हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. ज्यात कार्मेइलमधील प्रशिक्षण तळावरील हल्लाचा समावेश आहे. इस्रायली संरक्षण दलाला (IDF) काही रॉकेट्सचा हल्ला रोखण्यात यश आले. पण हैफामधील किरियत अता उपनगरातील हल्ल्यात घरे आणि कारचे नुकसान झाले. यात चार जण जखमी झाले.
सोमवारी उशिरा हिजबुल्लाहने हैफावर (Haifa) अतिरिक्त रॉकेट्स डागली; जो शहरावर आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. पण अनेक रॉकेट्स रोखण्यात आले. परंतु काहींमुळे नुकसान झाले. यानंतर, लेबनॉनमधून लाँच केलेल्या ड्रोनला मालकियाच्या उत्तरेकडील किबुट्झवरदेखील रोखण्यात आले. तर दुसरे ड्रोन लिमनजवळ क्रॅश झाले.