प्रतीकात्मक छायाचित्र. Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

Havana Syndrome explained | 'हवाना सिंड्रोम' खोटा ठरवण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञाच्‍या मेंदूला दुखापत! नेमकं काय घडलं?

Havana Syndrome explained | संकल्पना खोटी ठरविण्यासाठी स्वतःवरच केला प्रयोग

पुढारी वृत्तसेवा

हवाना सिंड्रोम हा एक अनाकलनीय आजार असून यामध्ये तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येणे यांसारखी लक्षणे दिसतात.

Havana Syndrome Norwegian scientist brain injury

एका नॉर्वेजियन शास्त्रज्ञाने 'हवाना सिंड्रोम' ही संकल्पना खोटी ठरविण्यासाठी स्वतःवरच एका घातक शस्त्राची चाचणी केली. मात्र, या प्रयोगामुळे त्यांच्या मेंदूला दुखापत झाली आहे, असे वृत्त द टेलिग्राफने दिले आहे. या घटनेनंतर पेंटागॉन आणि व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी किमान दोनदा नॉर्वेला भेट दिल्‍याची माहितीही समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

हवेतून लहरी सोडणारी उपकरणे माणसासाठी घातक नसतात, हे शास्त्रज्ञांना सिद्ध करायचे होते. यासाठी त्यांनी मायक्रोवेव्ह ऊर्जा सोडणारे एक यंत्र तयार केले. २०२४ मधील एका अत्यंत गोपनीय संशोधन प्रकल्पावर काम करत असताना, त्यांनी स्वतःवर चाचणी घेतली. चाचणीनंतर त्यांना नेमकी तीच लक्षणे जाणवू लागली, जी जगभरातील अमेरिकन राजदूतांना 'हवाना सिंड्रोम' दरम्यान जाणवली होती. 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, या उपकरणाच्या चाचणीदरम्यान संबंधित शास्त्रज्ञालाच त्या गूढ आजाराची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर नॉर्वे सरकारने या प्रकरणाची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्था 'सीआयए'ला (CIA) दिली होती. या घटनेनंतर पेंटागॉन आणि व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी किमान दोनदा नॉर्वेला भेट दिली. मात्र, तज्ज्ञांच्या मते या शास्त्रज्ञाची लक्षणे ही 'हवाना सिंड्रोम'च्या मूळ लक्षणांशी पूर्णपणे जुळणारी नाहीत.

'हवाना सिंड्रोम' म्हणजे काय?

२०१६ मध्ये क्युबाची राजधानी 'हवाना' येथील अमेरिकन दूतावासात काम करणाऱ्या लोकांना सर्वात आधी हा त्रास झाला. त्यांना अचानक तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, विसर पडणे आणि ऐकू न येणे अशा समस्या जाणवू लागल्या. म्हणून याला 'हवाना सिंड्रोम' नाव पडले. आतापर्यंत १५ पेक्षा जास्त देशांमधील अमेरिकन सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारच्या त्रासाची तक्रार केली आहे. अमेरिकन सरकारने या आजाराला अधिकृतपणे अनाकलनीय प्रकृती अस्वास्थ्य म्हणजे ज्याचा उलगडा होत नाही असा आजार, असे म्हटले आहे. प्रयोगावेळी नॉर्वेजियन शास्त्रज्ञाच्या मेंदूला दुखापत झाल्यानंतर पेंटागॉन आणि व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी किमान दोनदा नॉर्वेला भेट दिली. मात्र, तज्ज्ञांच्या मते या शास्त्रज्ञाची लक्षणे ही 'हवाना सिंड्रोम'च्या मूळ लक्षणांशी पूर्णपणे जुळणारी नाहीत, असेही 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

नेमका दावा काय?

काही लोकांचा असा दावा आहे की, हा आजार नैसर्गिक नसून एका गुप्त यंत्राचा परिणाम आहे. हे यंत्र अदृश्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक (विद्युतचुंबकीय) लहरींच्या साहाय्याने माणसाच्या शरीरावर लांबून मारा करू शकते. हवाना सिंड्रोमच्या बाबतीत, याच लहरींचा (विशेषतः मायक्रोवेव्ह) वापर करून मेंदूवर परिणाम केला गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

व्हेनेझुएलातील कारवाई आणि 'गुप्त यंत्राचा' वापर

३ जानेवारी रोजी व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईत अमेरिकेने एका विशेष 'गुप्त यंत्राचा' वापर केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मादुरो यांच्या एका अंगरक्षकाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर या कारवाईची माहिती दिली. त्याच्या मते, एका विचित्र 'आवाजाच्या लाटेने' सर्व सुरक्षा रक्षक जागच्या जागी कोसळले. या लहरींमुळे सुरक्षा रक्षकांच्या नाकातून रक्त येऊ लागले, त्यांना उलट्या झाल्या आणि काही काळ ते हालचालही करू शकले नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत याचा उल्लेख "गोंधळात टाकणारे यंत्र" असा केला होता. ट्रम्प यांच्या मते, जेव्हा विरोधकांनी त्यांची रॉकेट डागण्यासाठी बटणे दाबली, तेव्हा त्या यंत्रामुळे काहीच काम झाले नाही. शत्रूची सर्व तयारी असूनही ही यंत्रणा निकामी ठरली.

तपासातील गोंधळ आणि नवीन निष्कर्ष

हवाना सिंड्रोमच्या कारणांबाबत अमेरिकन गुप्तचर संस्था (CIA) आणि सरकार यांच्यात अजूनही एकमत नाही. अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर संस्था (CIA) ने जानेवारी २०२२ मध्ये असा निष्कर्ष काढला होता की, अचानक होणाऱ्या मेंदूच्या या आजारामागे बहुधा कोणत्याही परदेशी देशांचा हात नसावा. ही केवळ आरोग्याशी संबंधित वैयक्तिक समस्या असू शकते. मात्र, २०२४ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी वेगळे मत मांडले आहे. त्यांच्या मते, ही लक्षणे एखाद्या देशाने जाणीवपूर्वक निर्माण केली आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही; पण यासाठी एखादा 'बाह्य घटक' कारणीभूत असावा, असा संशय व्यक्त केला आहे.

अमेरिका हवाना सिंड्रोमचे रहस्य उकलणार?

'सीएनएन' (CNN) च्या रिपोर्टनुसार, अमेरिकन सरकारने एका अत्यंत गुप्त मोहिमेद्वारे एक विशेष यंत्र विकत घेतले आहे. हे यंत्र 'हवाना सिंड्रोम' या रहस्यमय आजाराचे मुख्य कारण असू शकते, असा संशय आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसांत अमेरिकेच्या 'होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन' या संस्थेने कोट्यवधी रुपये खर्च करून हे यंत्र मिळवले आहे. हे यंत्र 'रेडिओ लहरींचे झटके' निर्माण करते. याच लहरींमुळे मानवी मेंदूवर परिणाम होतो, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. हे यंत्र पूर्णपणे रशियात बनलेले नसले तरी, त्यामध्ये वापरलेले महत्त्वाचे सुटे भाग रशियन बनावटीचे आहेत. यामुळे या प्रकरणातील संशय अधिक बळावला आहे. अमेरिकन सरकारला या गुप्त यंत्राबद्दल माहिती कशी मिळाली आणि त्यांनी ते कोणाकडून विकत घेतले, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT