Hantavirus
लंडन: अर्जेंटिनाहून निघालेल्या 'एमव्ही होंडियस' या डच जहाजावर हंताव्हायरसचा संसर्ग पसरल्याने जागतिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या जहाजावरील काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले की, ही स्थिती कोविड-१९ सारखी महामारी नसून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
क्रूझवरील प्रवाशांच्या माध्यमातून संसर्ग पसरू नये यासाठी WHO ने ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड, स्वित्झर्लंड, सिंगापूर आणि तुर्कीसह १२ देशांना अधिकृतपणे सतर्क केले आहे. या देशांतील नागरिक सेंट हेलेना येथे क्रूझवरून उतरले होते. जहाजावर आतापर्यंत ८ संशयास्पद रुग्ण आढळले असून, त्यापैकी ५ जणांना हंताव्हायरसची बाधा झाल्याची पुष्टी झाली आहे, तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, "हंताव्हायरस हा नवा विषाणू नाही. हा कोरोना व्हायरस नाही आणि ही महामारीची स्थितीही नाही. सहा वर्षांपूर्वी जगाने कोविड-१९ दरम्यान जो काळ पाहिला, तशी ही परिस्थिती नाही." बहुतांश हंताव्हायरसचे स्ट्रेन मानवाकडून मानवाकडे संक्रमित होत नाहीत, असेही WHO च्या तज्ज्ञ डॉ. मारिया यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी एका पुरुष प्रवाशामध्ये श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि ११ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही लक्षणे सामान्य वाटल्याने त्याची चाचणी करण्यात आली नव्हती. त्यानंतर जोहान्सबर्ग आणि स्वित्झर्लंडमध्येही अशाच प्रकारची प्रकरणे समोर आल्यानंतर हा हंताव्हायरस असल्याचे निष्पन्न झाले.
सध्या WHO चे तज्ज्ञ आणि नेदरलँडचे डॉक्टर क्रूझवर उपस्थित असून ते प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करत आहेत. संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. हंताव्हायरसचा 'इन्क्युबेशन पिरीयड' सहा आठवड्यांचा असल्याने, आगामी काळात काही नवीन रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा विषाणू प्रामुख्याने उंदरांच्या विष्ठा, लाळ किंवा लघवीच्या संपर्कात आल्याने पसरतो. याची सुरुवातीची लक्षणे फ्लूसारखी (ताप, अंगदुखी) असतात. मात्र, स्थिती बिघडल्यास फुफ्फुसांमध्ये द्रव साचून श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. गंभीर परिस्थितीत रुग्णाला 'ECMO' मशीनच्या आधाराची गरज पडते. चिली आणि अर्जेंटिनासारख्या देशांत या आजारावर उपचार करण्यासाठी विशेष प्रोटोकॉल पाळले जातात.