Hamas chief widow
गाझा/इस्तंबूल : हमासचे माजी प्रमुख याह्या सिनवार यांच्या विधवा पत्नी समर मुहम्मद अबू झमर हीने बनावट पासपोर्टचा वापर करून गाझा पट्टीतून पलायन केले असून, सध्या ती तुर्कस्तानात वास्तव्यास आहे आणि तिने तेथे पुनर्विवाह केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्रायली वृत्तसंस्था Ynet ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
समर यांनी 2011 मध्ये याह्या सिनवार यांच्याशी विवाह केला होता. त्यांनी इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ गाझा येथून धर्मशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
त्या आणि त्यांच्या मुलांना गाझामधून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत, उच्च पातळीवर समन्वय आणि बनावट कागदपत्रांची आवश्यकता होती. त्यांनी एका Gazan महिलेचा बनावट पासपोर्ट वापरून रफाह सीमा ओलांडून इजिप्तमार्गे पलायन केले.
गाझामधील एका स्थानिक स्त्रोताने Ynet ला सांगितले, "ती आता येथे नाही, ती मुलांसह तुर्कस्तानात आहे."
याह्या सिनवार यांचा मृत्यू ऑक्टोबर 2024 मध्ये इस्रायली कारवाईत झाला. त्यानंतरच समर यांनी तुर्कस्तानात एका दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केला. या विवाहाची योजना हमासच्या राजकीय विंगमधील वरिष्ठ अधिकारी फाथी हम्माद यांनी आखली होती, अशी माहितीही अहवालात देण्यात आली आहे.
हमासकडून वरिष्ठ नेत्यांच्या कुटुंबांना युद्धाच्या सुरूवातीच्या टप्प्यात सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एक गुप्त यंत्रणा उभी करण्यात आली होती. या यंत्रणेमध्ये बनावट वैद्यकीय अहवाल, पासपोर्ट व अन्य कागदपत्रांचा वापर करून लोकांना बाहेर काढले जात होते.
याह्या सिनवार यांचे भाऊ मुहम्मद सिनवार यांची पत्नी नजवा हिनेही अशीच पलायनाची पद्धत वापरली होती. ती सध्या कुठे आहे, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. इस्रायली सुरक्षादलांनी या दोन्ही महिलांनी रफाह मार्गे गाझा सोडल्याचे स्पष्ट केले आहे, आणि त्यावेळी त्यांच्या पतींचा मृत्यू झाला नव्हता.
16 ऑक्टोबर 2024 रोजी इस्रायली लष्कराच्या एका गस्तीदरम्यान, रफाहमधील तल अल-सुलतान परिसरात एक ड्रोनने एका अर्धवट पडलेल्या इमारतीत सिनवार यांना शोधले. त्यांनी डोळ्यांना धूळ लागलेली असताना एका खुर्चीत बसून ड्रोनकडे काठी फेकली होती. त्यानंतर त्या इमारतीवर गोळीबार झाला आणि डोके व शरीरावर गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
इस्रायलच्या गाझावरील कारवाईला 21 महिने पूर्ण झाले असून, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 59000 हून अधिक पॅलेस्टिनियन नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.
संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटनेने गाझामध्ये उपासमारीसारखी स्थिती निर्माण झाल्याचा इशारा दिला आहे. 2 मार्चपासून इस्रायलच्या नाकाबंदीमुळे अन्न, औषधे, पाणी आणि इंधन यांचा पुरवठा ठप्प झाला आहे. अलीकडील आठवड्यांमध्ये 111 नागरिक – त्यात लहान मुले आणि बाळांचा समावेश – उपासमारीमुळे मृत्यूमुखी पडले आहेत.
1 लाखाहून अधिक महिला आणि मुले तीव्र कुपोषणाने ग्रस्त आहेत. अन्नसाठ्यांसाठी धाव घेताना 1060हून अधिक नागरिक मृत्यूमुखी, तर 7200 हून अधिक जखमी झाले आहेत. 4.7 लाख लोक फेज 5 (catastrophic hunger) च्या टप्प्यावर, म्हणजेच पूर्ण उपासमारीच्या स्थितीत आहेत. WHO च्या म्हणण्यानुसार, 75 टक्के गाझावासी भीषण अन्नटंचाईने त्रस्त आहेत आणि अत्यावश्यक मदत काही किलोमीटरवर असतानाही पोहोचू शकत नाहीये.