Google releases mosquitoes file photo
आंतरराष्ट्रीय

Google: गुगल अमेरिकेत सोडणार ३ कोटी डास! नेमकं कारण काय?

अमेरिकेत 'वेस्ट नाईल व्हायरस' आणि 'सेंट लुईस एन्सेफलायटीस' यांसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या घातक आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुगलची मूळ कंपनी 'अल्फाबेट'ने एक मोठी आणि अनोखी मोहीम हाती घेतली आहे.

मोहन कारंडे

Google releases mosquitoes

वॉशिंग्टन: अमेरिकेत 'वेस्ट नाईल व्हायरस' आणि 'सेंट लुईस एन्सेफलायटीस' यांसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या घातक आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुगलची मूळ कंपनी 'अल्फाबेट'ने एक मोठी आणि अनोखी मोहीम हाती घेतली आहे. अल्फाबेट कंपनी पुढील दोन वर्षांत कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा राज्यांमध्ये 'वोल्बाचिया' या जीवाणूचा संसर्ग झालेले सुमारे ३ कोटी २२ लाख विशेष डास सोडण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेकडे परवानगी मागितली असून, सध्या या प्रस्तावावर अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे.

नर डास माणसांना चावत नाहीत; नेमका हाच आहे प्लॅन!

अल्फाबेटच्या 'व्हेरिली' या लाईफ सायन्सेस उपकंपनीने २०१६ मध्ये 'डीबग' हा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पांतर्गत प्रयोगशाळेत 'वोल्बाचिया' जीवाणूंचा संसर्ग झालेले केवळ नर डास तयार केले जातात. डीबग या जिवाणूने संक्रमित नर डासांची पैदास करेल आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडेल. जेव्हा हे नर, त्याच प्रजातीचे विषाणू नसलेल्या माद्यांसोबत मिलन करतात, तेव्हा त्यातून निर्माण होणारी अंडी निरुपयोगी ठरतात आणि त्यातून पिल्ले बाहेर येत नाहीत. त्यामुळे स्थानिक डासांची संख्या हळूहळू कमी होते. माणसांना फक्त मादी डासच चावत असल्यामुळे, नागरिकांना त्याचा कोणताही त्रास होणार नाही किंवा डास चावण्याचा धोका वाढणार नाही.

'क्युलेक्स' डासांवर निशाणा

या मोहिमेत प्रामुख्याने 'क्युलेक्स' प्रजातीच्या डासांना लक्ष्य केले जाणार आहे. अमेरिकेत थैमान घालणाऱ्या 'वेस्ट नाईल व्हायरस'चे हेच डास मुख्य वाहक आहेत. अमेरिकेच्या 'सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन'च्या अहवालानुसार, वेस्ट नाईल हा अमेरिकेतील डासांमुळे पसरणारा धोकादायक आजार आहे. नुकतेच कॅलिफोर्नियाच्या रिव्हरसाईड काउंटीमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत.

गुगलचे 'आयटी' आणि 'रोबोटिक्स' तंत्रज्ञान मदतीला

यापूर्वी फ्लोरिडामध्ये अशा प्रकारचे छोटे प्रयोग यशस्वी झाले आहेत, परंतु कोट्यवधींच्या संख्येने डास तयार करणे आणि ते वातावरणात सोडणे हे एक मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यासाठी गुगल आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. 'डीबग' प्रकल्पांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेक्स-सॉर्टिंग सिस्टीम (नर आणि मादी डास वेगळे करणारे तंत्रज्ञान), स्वयंचलित रोबोट्स आणि विशेष वाहनांचा वापर केला जात आहे.

पुढील दोन वर्षांचे नियोजन

मंजुरी मिळाल्यास हा प्रयोग टप्प्याटप्प्याने राबवला जाईल. पहिल्या वर्षी कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या दोन्ही राज्यांत प्रत्येकी १ कोटी ६० लाख डास सोडले जातील. तर दुसऱ्या वर्षी पुन्हा दोन्ही राज्यांत प्रत्येकी १ कोटी ६० लाख डास सोडले जातील. पर्यावरण संरक्षण संस्था जूनच्या सुरुवातीपर्यंत यावर जाहीर हरकती व सूचना मागवत असून, त्यानंतर प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, हे डास नेमक्या कोणत्या शहरांमध्ये सोडले जाणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT