G7 Summit Melodi viral video
एवियन: फ्रान्समधील एवियन शहरात सध्या 'जी-७' शिखर परिषद सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते या परिषदेसाठी एकत्र आले आहेत. जागतिक राजकारणावर गंभीर चर्चा सुरू असतानाच, पडद्यामागील नेत्यांच्या अनौपचारिक गप्पा आणि काही रंजक किस्से 'मायक्रोफोन'मध्ये रेकॉर्ड झाले आहेत. सध्या या खासगी संभाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेत्यांमधील जुगलबंदी चर्चेत आली आहे.
बैठक सुरू होण्यापूर्वी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक फर्ज यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मिश्किलपणे विचारले, "तुम्ही सकाळी सिगारेट पिली का?" त्यावर मेलोनी यांनी, "मी १ मे पासून सिगारेट पूर्णपणे सोडली आहे," असे उत्तर दिले. हे ऐकताच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर आणि जपानच्या पंतप्रधान सनाए तकाइची यांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, मार्क कार्नी यांनी "तुम्ही निकोटिन पॅच लावलाय का?" असा टोमणा मारताच तिथे उपस्थित सर्व नेत्यांमध्ये एकच हशा पिकला.
एकीकडे भू-राजकीय मुद्द्यांवरून मतभेद असले, तरी फुटबॉल या विषयावर सर्वच जागतिक नेते एका सुरात बोलताना दिसले. मायक्रोफोनमध्ये रेकॉर्ड झालेल्या संभाषणात अनेक नेते फिफा वर्ल्डकप आणि फुटबॉल क्लबबद्दल चर्चा करत होते. एका नेत्याने फ्रान्सच्या संघाचे कौतुक करत 'Allez les bleus!' अशी घोषणा दिली, तर दुसऱ्याने 'पॅरिस सेंट-जर्मन'च्या चॅम्पियन्स लीग मधील विजयाचे कौतुक केले. ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनीही केप व्हर्डेने स्पेनविरुद्ध खेळलेल्या ड्रॉ मॅचची प्रशंसा केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक छोटेसे विधान या परिषदेत पुन्हा चर्चेचा विषय बनले. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्याशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "तुम्हाला समजले का?" आणि पुढे थांबून म्हणाले, "ग्रीनलँड..." यानंतरचे त्यांचे बोलणे ऐकू आले नाही. ट्रम्प यांनी यापूर्वीही ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, ज्यावरून युरोपीय देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
एक बैठक संपल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आपले घड्याळ टेबलवरच विसरले. हे पाहून कॅनडाचे पंतप्रधान कार्नी म्हणाले, "मॅक्रॉन घड्याळ विसरलेत." यावर ट्रम्प यांनी तात्काळ उत्तर दिले, "विसरले असतील तर ते मला देऊन टाका!" ट्रम्प यांच्या या मिश्किल टिप्पणीवर सर्व नेत्यांनी मनसोक्त दाद दिली.
पुढील वर्षी फ्रान्समध्ये होणाऱ्या सायकलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्रचारासाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सर्व G-7 नेत्यांना एक-एक सायकल भेट दिली. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे की त्यांना गोल्फशिवाय इतर कोणताही व्यायाम किंवा शारीरिक कष्टाची कामे आवडत नाहीत. त्यामुळे ही भेट विशेष चर्चेत राहिली. तसेच, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी ट्रम्प यांना '४७' नंबर लिहिलेली जर्मनीच्या फुटबॉल संघाची जर्सी भेट दिली, जी त्यांच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळाचे प्रतीक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. या भेटीदरम्यान मेलोनी यांनी स्वागत करत, "तुम्हाला पुन्हा भेटून आनंद झाला," असे म्हटले. यावर पंतप्रधान मोदींनी 'इन्स्टाग्राम'चा उल्लेख केला. मेलोनी यांनीही लगेचच, "हो, आपण इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त प्रसिद्ध आहोत!" असे उत्तर देताच तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये हशा पिकला.