Europe Heatwave : मुले कारमध्ये अडकली; आईलाही कळले नाही, उष्णतेमुळे दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू file photo
आंतरराष्ट्रीय

Europe Heatwave : मुले कारमध्ये अडकली; आईलाही कळले नाही, उष्णतेमुळे दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू

उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे देशभरातील ८०० हून अधिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

france heatwave tragedy children found dead in locked car

पुढारी ऑनलाईन : सध्या संपूर्ण युरोप भीषण उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात आहे. फ्रान्स, ब्रिटन आणि इतर अनेक देशांतून उष्माघातामुळे धक्कादायक घटना समोर येत आहेत. फ्रान्समध्ये अशीच एक हृदयद्रावक घटना घडली असून, प्रचंड उष्णतेत कारमध्ये अडकलेल्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, दोन आणि चार वर्षांचे हे दोन्ही भाऊ त्यांच्या आईच्या नकळत कारमध्ये जाऊन बसले. आई कार लॉक करून घरात गेली, मात्र मुलं आतच असल्याची तिला कल्पनाही नव्हती. काही वेळाने मुलांचा शोध सुरू झाल्यानंतर ते कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

'द सन'च्या वृत्तानुसार, ही घटना दक्षिण फ्रान्समधील कार्पेंट्रास येथे घडली. दुपारी सुमारे १.२० वाजता आपत्कालीन सेवांना फोन करण्यात आला. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने सांगितले की, दोन्ही मुले हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर अवस्थेत आढळली.

बंद कारचे तापमान ७० अंशांपर्यंत पोहोचू शकते

कार्पेंट्रासच्या सरकारी अभियोक्ता हेलेन मॉर्गेस यांनी सांगितले की, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार, प्रचंड उष्णता हेच मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, उन्हात उभी असलेल्या बंद कारमधील तापमान ७० अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. एवढी उष्णता कोणाच्याही जीवासाठी घातक ठरू शकते. विशेषतः लहान मुलांचे शरीर अत्यधिक तापमान सहन करू शकत नसल्याने त्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो.

या घटनेबाबत कार्पेंट्रासचे महापौर हर्वे डी लेपिनो यांनी दुःख व्यक्त करत, "ही घटना ऐकून आम्ही हादरलो आहोत," असे म्हटले.

फ्रान्समध्ये उष्णतेचा कहर

या प्रकरणात मुलांच्या आईची अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही. ज्या वॉक्लूज विभागात ही घटना घडली, तेथे दुपारपासून 'ऑरेंज हीट अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, दक्षिण-पश्चिम फ्रान्समधील गिरोंड विभागातही उष्णतेमुळे तीन वृद्धांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्स सरकारने देशातील ९६ विभागांपैकी ४९ विभागांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, आणखी ४० विभाग 'ऑरेंज हीट वॉर्निंग'च्या कक्षेत आहेत. त्यामुळे जवळपास संपूर्ण देश उष्णतेच्या आपत्कालीन इशाऱ्याखाली आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, काही भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. 'मेटिओ-फ्रान्स'च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दिवसाबरोबरच रात्रीचे तापमानही असामान्यरीत्या जास्त राहणार असून लाखो नागरिकांना रात्रीदेखील उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.

शाळा बंद, नागरिकांना सावधतेचा इशारा

उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे देशभरातील ८०० हून अधिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सुमारे १,८०० शाळांना विद्यार्थ्यांना लवकर सुट्टी देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वीकेंडदरम्यान घडलेल्या बुडून मृत्यूच्या अनेक घटनांनंतर फ्रेंच सरकारने नागरिकांना तलाव आणि नद्यांमध्ये पोहण्यासाठी जाताना विशेष काळजी घेण्याचा इशारा दिला आहे.

शनिवार आणि रविवारी अवघ्या ४८ तासांत मृत्यू झालेल्या १३ जणांमध्ये एका १३ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. हवामान तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, ही उष्णतेची लाट २००३ मधील फ्रान्सच्या भीषण उष्णतेइतकी गंभीर ठरू शकते. त्या वेळी आलेल्या उष्णतेच्या लाटेत सुमारे १५ हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT