Flydubai Indian Captain Saving Flight : को-पायलटनेच विमान कोसळवण्याचा केलेला प्रयत्न भारतीय कॅप्टनच्या प्रसंगावधनामुळे उधळला गेला. सह-पायलटने केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी होऊनही भारतीय कॅप्टनने माघार न घेता त्याला रोखले आणि १८० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले.
इस्रायलच्या 'वायनेट न्यूज' आणि 'चॅनेल १२'ने दिलेल्या वृत्तानुसार, कॉकपिटमध्ये सह-पायलटने अचानक मुख्य कॅप्टनवर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झाल्यानंतरही भारतीय कॅप्टनने मागे न हटता सह-पायलटचा मुकाबला केला. या झटापटीत विमानात प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या 'ऑफ-ड्युटी' पायलट्सनी मध्यस्थी करत विमानाचा ताबा घेतला आणि विमान सुरक्षितपणे खाली उतरवले. कॅप्टनच्या या धैर्यामुळे विमानावरील १८० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
'इंडिया टुडे टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, "इस्रायली अधिकारी आणि प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार सह-पायलट हा ओमानचा नागरिक होता. मुख्य पायलटवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न करणारा दहशतवादी तोच होता. मला मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य पायलट भारतीय नागरिक आहेत."
विमान कोसळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या ओमानी सह-पायलटला इस्रायलला उड्डाण करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल आता तपास सुरू आहे. रिपोर्टनुसार, इस्रायलच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याची किंवा इस्रायलमध्ये उतरण्याची परवानगी मिळण्यापूर्वी सर्व परदेशी कर्मचारी (क्रू मेंबर्स), विशेषतः अरब किंवा आखाती देशांतील कर्मचाऱ्यांची कठोर आणि वैयक्तिक सुरक्षा तपासणी केली जाते.
"कॉकपिटमध्ये एका पायलटने दुसऱ्या पायलटावर चाकूने हल्ला केला. हे विमान हायजॅक करून जमिनीवर आदळण्याचा, म्हणजेच थेट ९/११ सारखा भीषण अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न होता," असा धक्कादायक दावा एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने 'N12' या वृत्तवाहिनीने केला आहे. विमानातील एका महिला प्रवाशाने कॉकपिटजवळ जाऊन पाहिले असता तिथे मोठ्या प्रमाणावर रक्त सांडलेले दिसले. हे पाहून ती घाबरून 'मदत करा, मदत करा' म्हणून ओरडू लागली. तिचाल पाहून तात्काळ काही प्रवाशांनी कॉकपिटमध्ये धाव घेतली आणि त्या माथेफिरूला पकडून ठेवले.
हल्ल्याचा प्रयत्न करणारा सह-वैमानिक मूळचा ओमानचा असून त्याच्याकडे दुहेरी नागरिकत्व होते का, याचा शोध आता अधिकारी घेत आहेत. या दुहेरी नागरिकत्वामुळेच त्याला इस्रायलला जाणाऱ्या विमानात एंट्री मिळाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. इस्रायली सूत्रांनी 'चॅनेल १२'ला दिलेल्या माहितीनुसार, हा सह-पायलट गेल्या वर्षभरापासूनच या विमान कंपनीत काम करत होता. दोन्ही वैमानिकांवर सध्या सौदीत उपचार सुरू आहेत.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराला कॉकपिटमधून बाहेर काढण्यात आले. दोन्ही वैमानिकांना आत आणण्यात यश आले. त्यानंतर त्यापैकी एकाने विमानाचे नियंत्रण हाती घेतले, तर दुसऱ्याला त्या धक्क्यातून सावरण्यास अधिक वेळ लागला. वैमानिकाला चाकू भोसकला होता, त्याची प्रकृती गंभीर होती. विमानातून प्रवास करणाऱ्या एका इस्रायली दंतवैद्याने जखमी वैमानिकावर उपचार केले.