आंतरराष्ट्रीय

कोरोनापेक्षाही भयंकर रोग आला; ४८ तासांत होतो मृत्यू

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनाच्या एका महाभयंकर साथीचा जगाने मुकाबला केल्यानंतर आता पुन्हा एका भयंकर रोगाने धुमाकूळ घातला आहे. जपानमध्ये कोरोनापेक्षाही भयंकर असलेल्या मांस खाणाऱ्या जीवाणूमुळे (flesh-eating bacteria) होणारा रोग पसरत आहे. कोविड-काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर जपानमध्ये हा अतिशय धोकादायक आजार समोर आला आहे. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (एसटीएसएस) असे या रोगाचे नाव असून यामुळे ४८ तासांच्या आत रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

'ही' आहेत लक्षणे

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजच्या मते, २ जूनपर्यंत जपानमध्ये एसटीएसएसची ९७७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर गेल्यावर्षी ९४१ प्रकरणांची नोंद झाली होती. दुर्मिळ अशा मांस खाणाऱ्या जीवाणू गट अ स्ट्रेप्टोकोकस (GAS) मुळे जळजळ आणि घसा खवखवतो, ज्याला 'स्ट्रेप थ्रोट' म्हणतात. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, या प्रकारचे जीवाणू झपाट्याने विकसित होऊ शकतात, ज्यामध्ये अंग दुखणे, सूज येणे, ताप येणे, रक्तदाब कमी होणे, ज्यामुळे नेक्रोसिस, श्वासोच्छवासाचा त्रास, अवयव निकामी होणे आणि मृत्यू देखील होऊ शकतो. टोकियो वुमेन्स मेडिकल युनिव्हर्सिटीतील संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक केन किकुची यांनी सांगितले की, "संसर्ग झालेल्या रूग्णाचा मृत्यू ४८ तासांच्या आत होत आहे. सुरूवातीला रुग्णाच्या पायाला सूज येते. त्यानंतर सूज वाढते आणि ४८ तासांच्या आत मृत्यू होतो."

'या' वयाच्या लोकांना अधिक धोका

या आजाराचा धोका ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना जास्त असतो. किकुची यांनी सांगितले की, या संसर्गाच्या सध्याच्या दरानुसार, जपानमध्ये यावर्षी रुग्णांची संख्या २ हजार ५०० पर्यंत पोहोचू शकते आणि मृत्यू दर ३० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

ब्लूमबर्गच्या मते, जपान व्यतिरिक्त अलीकडेच इतर अनेक देशांमध्ये 'स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम'ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २०२२ च्या अखेरपर्यंत ५ युरोपीय देशांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे आक्रमक गट अ स्ट्रेप्टोकोकस (iGAS) रोगाची प्रकरणे नोंदवली होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT