Evolution of kissing first kiss 21 million years ago study humans apes:
किस म्हणजे प्रेम, रोमॅन्स आणि भावना यांचं प्रतीक मानलं जातं. पण वैज्ञानिकांच्या ताज्या संशोधनाने दाखवून दिलं की किस फक्त माणसांपुरतं मर्यादित नाही. माणसांसोबत माकडे, अस्वल, लांडगे, अगदी पक्षीही किस करतात.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी किसचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अभ्यासानुसार मानव आणि इतर मोठ्या माकडांच्या पूर्वजांनी जवळपास 2 कोटी 10 लाख वर्षांपूर्वीच किस करणं सुरू केलं असावं. म्हणजे किस हा प्रेमाचा “नवीन शोध” नसून याला लाखो वर्षांचा जुना इतिहास आहे.
या संशोधनातून हेही समोर आलं की नेअंडरथल्स म्हणजे मानवाचे प्राचीन नातेवाईक, हे देखील किस करत असावेत. त्यात एक खास माहिती अशी की मानव आणि नेअंडरथल्स यांच्या लाळेमध्ये एकच प्रकारचा सूक्ष्म जंतू (oral microbe) आढळला आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की “दोन्ही प्रजातींमधील लाळ देवाण-घेवाण हजारो वर्षे चालू होती.” याचा साधा अर्थ मानव आणि नेअंडरथल्स यांनी एकमेकांना किसही केले असण्याची शक्यता आहे.
किसमुळे थेट प्रजनन होत नाही. तरीही लाखो वर्षांपासून मानव आणि प्राणी हे वर्तन करत आले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, माकडांमध्ये grooming मधून kissingची सुरुवात झाली असावी. किसमुळे जोडीदाराचे आरोग्य आणि शरीरातील रसायनं तपासायला मदत होते. पण किस कशासाठी याचे ठोस उत्तर मिळालेले नाही.
किस हा फक्त रोमॅन्स किंवा चित्रपटातील सीन नाही. तो आपल्या उत्क्रांतीचा भाग आहे, मानवाच्या अस्तित्वाइतका जुना. संशोधक म्हणतात ''किस ला मानवापुरतं मर्यादित किंवा फक्त रोमँटिक समजू नका. हे वर्तन आपल्या पूर्वीच्या नातेवाईकांमध्येही टिकून आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास गरजेचा आहे.”