Tsunami wave hits Russia after 8.8 magniture earthquake
कामचत्का (रशिया): रशियाच्या पूर्व किनारपट्टीला बुधवारी (30 जुलै) एका शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर आलेल्या विनाशकारी त्सुनामीच्या लाटांनी संपूर्ण प्रशांत महासागर क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.
रशियातील कामचत्का द्वीपकल्पाजवळ समुद्राच्या पोटात झालेल्या या भूकंपाने रशियातील अनेक किनारी वस्त्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण केले असून, प्रशासनाने तातडीने धोक्याचा इशारा जारी केला आहे.
या मोठ्या भूकंपानंतर जपान आणि रशियाला त्सुनामी लाटेची तडाखा बसला. अलास्का, हवाई आणि न्यूझीलंड तसेच येथे त्सुनामीचे इशारे जारी करण्यात आले. होनोलूलूमध्ये त्सुनामी अलर्ट सायरन वाजले, ज्यामुळे रहिवाशांनी उंच जागीकडे जाण्यास सुरुवात केली. हवाईसाठीही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्रात 8.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली अत्यंत कमी खोलीवर असल्याने त्याचा परिणाम थेट समुद्राच्या पृष्ठभागावर दिसून आला.
यानंतर काही वेळातच त्सुनामीच्या उंच लाटांनी रशियाच्या कुरिल बेटे आणि कामचत्काच्या किनारी भागांना जोरदार तडाखा दिला.
रशियाच्या कुरिल द्वीपसमूहातील मुख्य शहर सेव्हेरो-कुरिल्स्क येथे त्सुनामीची पहिली लाट पोहोचल्याची माहिती स्थानिक राज्यपाल वलेरी लिमारेन्को यांनी दिली. त्यांनी खात्री दिली की सर्व रहिवासी सुरक्षित असून, दुसऱ्या लाटेचा धोका टळेपर्यंत ते उंच जागेवर राहतील.
सेव्हेरो-कुरिल्स्क या प्रमुख वस्तीमध्ये त्सुनामीच्या लाटा शिरल्याचे वृत्त आहे. स्थानिक प्रशासनाने वेळीच सूत्रे हलवत नागरिकांना किनारी भागातून दूर, उंच आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये समुद्राचे पाणी शहरात घुसल्याचे, गाड्या वाहून जात असल्याचे आणि घरांचे नुकसान झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे. या दृश्यांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
त्सुनामीचा धोका लक्षात घेता रशियन प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. किनारी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
पुढील काही तास धोका कायम असल्याने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असले तरी, प्रशासनाच्या तत्परतेमुळे आतापर्यंत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आपत्कालीन सेवा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
रशियातील या घटनेचे पडसाद संपूर्ण प्रशांत महासागर क्षेत्रात उमटले आहेत. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने (PTWC) अनेक देशांसाठी धोक्याचा इशारा जारी केला आहे.
जपान: जपानच्या हवामान संस्थेने आपल्या उत्तर-पूर्व किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपानच्या हवामानशास्त्र विभागानुसार, होक्कायडोच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या टोकाशी भागात 4.3 फूट उंचीची त्सुनामीची लाट नोंदवली गेली.
अमेरिका आणि कॅनडा: अलास्का, हवाई, तसेच अमेरिकेची पश्चिम किनारपट्टी (कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन) आणि कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातही त्सुनामीच्या लाटा पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये लाटांची उंची कमी असली तरी, समुद्रातील प्रवाह धोकादायक राहू शकतात.
एकंदरीत, रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर त्सुनामीने मोठे नुकसान केले असले तरी, प्रशासनाच्या वेळीच उचललेल्या पावलांमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे चित्र आहे.
मात्र, धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही आणि पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. संपूर्ण प्रशांत महासागर क्षेत्रातील देश परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती खबरदारी घेत आहेत.