Pakistan Political Slavery : पाकिस्तानमध्ये गुलामीचा अंत झालेला नसून केवळ तिचे स्वरूप बदलले आहे, असा खळबळजनक दावा जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फझल (JUI-F) या पक्षाचे प्रमुख मौलाना फझलुर रहमान यांनी केला आहे. देशाची आर्थिक धोरणे आणि संसाधनांवर आता जागतिक संस्थांचा ताबा असून, पाकिस्तान आपले सार्वभौमत्व गमावत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
मौलाना फझलुर रहमान एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), वर्ल्ड बँक आणि इतर कर्जदात्या देशांच्या दबावाखाली काम करत आहे. या आर्थिक मजबुरीमुळे देशाला आपले धोरणात्मक निर्णय स्वतंत्रपणे घेता येत नाहीत. पाकिस्तानला स्वतःच्या आर्थिक निर्णयांवर आणि नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण मिळवण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील खनन प्रकल्पांवरून मौलाना यांनी सरकारला धारेवर धरले. "चीन सध्या पाकिस्तानच्या कारभारावर नाराज असून, तो बलुचिस्तानमधील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमधून हळूहळू माघार घेत आहे," असा दावा त्यांनी केला. बलुचिस्तानच्या चागाई जिल्ह्यातील प्रसिद्ध 'रेको डिक' प्रकल्पात नेमके कोण खनन करत आहे आणि त्याचा खरा फायदा कोणाला मिळत आहे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अनेक दशकांपासून सुरू असलेला 'सैंदक' प्रकल्प अपेक्षित यश मिळवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.
देशातील आर्थिक आणि राजकीय समस्या सोडवण्यासाठी नवीन प्रांतांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव फझलुर रहमान यांनी फेटाळून लावला. नवे प्रांत बनवणे हा पाकिस्तानच्या संकटांवर थेट उपाय असू शकत नाही. जर असा कोणताही प्रस्ताव समोर आलाच, तर त्याचा निर्णय स्थानिक परिस्थिती आणि व्यावहारिक निकषांच्या आधारेच घेतला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.