आंतरराष्ट्रीय

iPhone 18 Scam | इराणमध्ये बुडालेल्या जहाजावरील 'आयफोन 18' स्वस्त दरात विकल्याचा दावा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

iPhone 18 Scam | साइबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

तेहरान : वृत्तसंस्था
इराणची राजधानी तेहरानमध्ये सध्या ॲपल कंपनीचे 'आयफोन १८' स्मार्टफोन अत्यंत स्वस्त दरात विकले जात असल्याच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ बुडालेल्या एका मालवाहतूक जहाजातून हे फोन बाहेर काढण्यात आले असून हा 'युद्धातील जप्त माल' असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जात आहे, असे वृत्त 'इराण इंटरनॅशनल'ने दिले आहे.

या जलमार्गाजवळ १३ ऑक्टोबर रोजी एक कंटेनर जहाज बुडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले. यात समुद्रावर तरंगणाऱ्या कंटेन्समधून महागडे परफ्यूम्स आणि आयफोन गोळा करताना स्थानिक नागरिक दिसत आहेत.

'व्हायनेट न्यूज'नुसार एका बोटीवर आयफोनचे खोके गोळा करतानाचे दृश्य दिसते असून ते 'आयफोन १८' असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, या संपूर्ण घटनाबाबत अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही.

छोट्या होड्या घेऊन मच्छीमार त्या फोनचे खोके गोळा करताना व्हिडिओत दिसत आहे. तसेच पाण्यावर फोनची शेकडो खोके तरंगताना दिसत आहेत. ते गोळा करण्यासाठी होणाऱ्या धावपळीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

खात्रीशिवाय ॲडव्हान्स पैसे न भरण्याचे आवाहन

फोन पाण्यापेक्षा जड असल्याने त्याची खोकी तरंगणे असंभवनीय वाटते, इराणच्या साइबर पोलिसांनी नागरिकांना खबदारीचा इशारा दिला आहे. कोणत्याही उत्पादनाची प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय आणि विक्रेत्याची खात्री पटल्याशिवाय ॲडव्हान्स पैसे किंवा डिपॉझिट भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जहाज बुडल्याच्या अफवांचा गैरफायदा घेऊन साइबर भामटे अस्तित्वात नसलेल्या वस्तूंसाठी स्वस्त दरांचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT