Jaffar Express Explosion :
बलूचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा पाकिस्तानची जाफर एक्सप्रेसवर हल्ला झाला आहे. यावेळी क्वेटा येथील या जाफर एक्सप्रेसमध्ये IED स्फोट झाला आहे. हा स्फोट सिंध आणि बलूचिस्तान बॉर्डरवरील सुल्तानकोट भागात झाला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात याच जाफर एक्सप्रेसवर बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं हल्ला केला होता. हा स्फोटानंतर रेल्वेचे जवळपास सहा डब्बे रूळावरून घसरले आहेत.
दरम्यान, बलोच रिबेल ग्रुप बलोच रिपब्लिक गार्ड्सनं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. या ट्रेनमधून पाकिस्तानी आर्मीचे कर्मचारी प्रवास करत होते म्हणून आम्ही या ट्रेनवर हल्ला केला असं सांगितलं. याबाबत बलोच रिपब्लिकन गार्ड्सनं एक अधिकृत वक्तव्य देखील प्रसिद्ध केलं आहे. यात ते म्हणतात, 'पाकिस्तानी लष्कराचे कर्मचारी ज्यावेळी या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी चढले त्यावेळी आम्ही या ट्रेनवर हल्ला केला. या स्फोटात काही पाकिस्तानी सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर काही जखमी झाले आहेत. रेल्वेचे सहा डब्बे रूळावरून घसरले आहेत.'
'या हल्ल्याची जबाबदारी बीआरजी (बलोच रिपब्लिकन गार्ड्स) स्विकारत आहे. जोपर्यंत बलूचिस्तान स्वतंत्र होत नाही तोपर्यंत अशा प्रकराचे ऑपरेशन सुरूच राहतील.' असं देखील बीआरजीनं आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटलं आहे.
दरम्यान, बचाव कार्य करणारी टीम घटनास्थळी पोहचली आहे. त्यांनी बचाव कार्य सुरू केलं असून स्फोटाच्या ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही लोकं जखमी झाल्याचं कळतंय मात्र कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही.
जाफर एक्सप्रेस ही क्वेट्टा ते पेशावर या दोन स्टेशनदरम्यान धावते. ही ट्रेन बलूचिस्तान रिबेल्सच्या सतत टार्गेटवर असते. गेल्या वर्षी ११ मार्च रोजी जाफर एक्सप्रेस बोलान भागात हायजॅक करण्यात आली होती. यात २१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं केलेल्या ऑपरेशनमध्ये ३३ बलोच रिबेल मारले गेले होते.
सप्टेंबर २४ मध्ये झालेल्या बॉम्बिंगमध्ये याच रेल्वेतील जवळपास १२ लोकं मृत्यूमुखी पडली होती. तर ऑगस्ट महिन्यात झालेल्या स्फोटात रेल्वेचे सहा डब्बे रूळावरून घसरले होते. त्यात ४ लोक जखमी झाले होते. ७ ऑगस्ट रोजी ही ट्रेन एका मोठ्या ब्लास्टमधून थोडक्यात वाचली होती. तर ४ ऑगस्टला या रेल्वेवर गोळीबार झाला होता.