Krasheninnikov volcano
कामचटका (रशिया) : रशियाच्या फार ईस्ट भागात झालेल्या तीव्र भूकंपानंतर ‘क्राशेनीनिकोव’ (Krasheninnikov) ज्वालामुखीचा तब्बल 600 वर्षांनंतर उद्रेक झाला आहे. या ऐतिहासिक स्फोटामुळे हवामान आणि हवाई वाहतुकीस मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
रशियाची अधिकृत वृत्तसंस्था RIA आणि कामचटका ज्वालामुखी उद्रेक प्रतिसाद पथकाच्या प्रमुख ओल्गा गिरीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, “1463 मध्ये येथे शेवटचा लाव्हा प्रवाह नोंदवण्यात आला होता. त्यानंतर असा स्फोट प्रथमच दिसून आला आहे.”
काही दिवसांपूर्वी झालेला 8.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यामुळे जपान, हवाई, फ्रेंच पोलिनेशिया, चिली येथे त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. शास्त्रज्ञांच्या मते, हा भूकंप या ऐतिहासिक ज्वालामुखीच्या जागृत होण्याचे मुख्य कारण असू शकतो
याच भूकंपानंतर कामचटकातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी 'क्ल्युचेवस्कॉय' नेही उद्रेक केला होता. आता ‘क्राशेनीनिकोव’चा उद्रेक त्याच भूकंपाशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एक मोठी फट ज्वालामुखीच्या शिखराजवळ स्पष्ट दिसत आहे, जिथून वाफा व वायू-गॅस मिश्रण उत्सर्जित होत आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाच्या कामचटका शाखेने सांगितले की, या स्फोटामुळे 6000 मीटर (सुमारे 3.7 मैल) उंचीपर्यंत राखेचे ढग तयार झाले आहेत.
हे ढग आता प्रशांत महासागराच्या दिशेने सरकत आहेत. सुदैवाने, या मार्गावर कोणतीही वस्ती नाही, असेही मंत्रालयाने सांगितले.
या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे 'ऑरेंज एव्हिएशन कोड' दिला गेला आहे, म्हणजेच हवाई वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या क्राशेनीनिकोवची उंची 1856६ मीटर आहे.