Epstein Sex Scandal Pudhari
आंतरराष्ट्रीय

Epstein Files: अमेरिकेतील एपस्टीन सेक्स स्कँडलमध्ये मोठा खुलासा; 68 फोटो जाहीर, बिल गेट्ससह अनेक दिग्गजांची नावे समोर

Epstein Sex Scandal: अमेरिकन संसदेच्या समितीने 68 नवे फोटो जाहीर केली असून, त्यात बिल गेट्ससह अनेक जागतिक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. या फाइल्समधून राजकारण, उद्योग आणि सत्तेच्या वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

Rahul Shelke

Epstein Sex Scandal: अमेरिकेतील कुख्यात जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल प्रकरणात आज मोठा खुलासा झाला आहे. एपस्टीनशी संबंधित गोपनीय फाइल्स सार्वजनिक होत असताना, या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. या फाइल्समध्ये जगातील नामवंत उद्योगपती, राजकारणी आणि प्रभावशाली व्यक्तींचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाशी संबंधित हजारो पानांची कागदपत्रे, सुमारे 95 हजार फोटो, आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड आणि इतर महत्त्वाचे पुरावे या फाइल्समध्ये आहेत. अमेरिकेच्या संसदेतील हाउस ओव्हरसाइट कमिटीच्या डेमोक्रॅट सदस्यांनी 68 नवीन फोटो जाहीर केले, ज्यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे.

या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक वुडी अ‍ॅलन, तत्त्वज्ञ नोम चॉम्स्की आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव बॅनन यांच्यासह पाच मोठ्या व्यक्ती दिसत आहेत.

फाइल्समध्ये नेमकं काय आहे?

या फाइल्स जाहीर झाल्यानंतर अमेरिकन सरकारला काही महत्त्वाच्या बाबींवर खुलासा करावा लागणार आहे. कागदपत्रांमधील कोणते भाग ब्लॅकआउट करण्यात आले आहेत आणि त्यामागचे कारण काय, हे स्पष्ट करावे लागेल. तसेच, कोणती माहिती जनतेसमोर आणली गेली आणि कोणती माहिती अजूनही गोपनीय ठेवण्यात आली आहे, हेही सांगावे लागणार आहे.

सरकारला या प्रकरणाशी संबंधित सर्व सरकारी अधिकारी आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींची यादीही जाहीर करावी लागेल. कायद्यानुसार, फाइल्स प्रसिद्ध झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत ही सर्व माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक आहे.

याआधी काय-काय समोर आलं आहे?

एपस्टीन प्रकरणाशी संबंधित अनेक कागदपत्रे याआधीच समोर आली आहेत. त्यामध्ये एपस्टीनची साथीदार गिस्लेन मॅक्सवेल हिचा 2021 मधील खटला समोर आला आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने आणि FBI ने काही गोपनीय फाइल्स प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र त्यातील बहुतांश माहिती आधीच जनतेसमोर आलेली होती. त्यामुळे त्या निर्णयावर टीकाही झाली होती. याशिवाय, मॅक्सवेलसोबत झालेल्या वादग्रस्त मुलाखतीचे शेकडो पानांचे उतारेही प्रसिद्ध करण्यात आले होते.

एपस्टीन प्रकरणाची सुरुवात कशी झाली?

या प्रकरणाची सुरुवात 2005 साली फ्लोरिडामध्ये झाली. एका 14 वर्षांच्या मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, एपस्टीनने ‘मसाज’च्या नावाखाली तिच्या मुलीला आपल्या आलिशान घरात बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक शोषण करण्यात आले.

पोलिस तपासात असे लक्षात आले की, हे एकच प्रकरण नव्हते. पुढील तपासात सुमारे 50 अल्पवयीन मुलींनी एपस्टीनविरोधात तक्रारी केल्या. एपस्टीनच्या मॅनहॅटन आणि पाम बीच येथील आलिशान विला आणि खासगी जेट ‘लोलिता एक्सप्रेस’ यांचा या गुन्ह्यांसाठी वापर केल्याचे समोर आले. एपस्टीन मुलींना पैशांचे, दागिन्यांचे आमिष दाखवत असे आणि धमक्याही देत असे. या सर्व प्रकारात त्याची मैत्रीण गिस्लेन मॅक्सवेल त्याला मदत करत होती.

मी टू चळवळीत एपस्टीन कसा अडकला?

2009 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर एपस्टीन काही काळ शांत राहिला. मात्र 2017मध्ये सुरू झालेल्या ‘मी टू’ चळवळीने त्याचे गुन्हे पुन्हा जगासमोर आणले. हार्वे वाइंस्टीन प्रकरणानंतर महिलांनी धाडसाने आपले अनुभव मांडायला सुरुवात केली.

याच काळात वर्जिनिया ग्रिफे नावाच्या महिलेने एपस्टीनविरोधात गंभीर आरोप केले. तिच्या म्हणण्यानुसार, तिचे तब्बल तीन वर्षे लैंगिक शोषण करण्यात आले होते. त्यानंतर जवळपास 80 महिलांनी एपस्टीनविरोधात तक्रारी दाखल केल्या.

या सगळ्या घडामोडींमुळे एपस्टीन प्रकरण पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनले असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT