जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी आणखी एक विक्रम स्थापित केला आहे. टेस्लाच्या भागधारकांनी मस्क यांच्यासाठी विक्रमी १ ट्रिलियन डॉलर (सुमारे ८८ लाख कोटी रुपये किंवा त्याहून अधिक) पगार पॅकेजला मंजुरी दिली आहे. या पॅकेजमधील एक दिवसाची रक्कम सुमारे २४ हजार कोटी रुपये ($240,000,000,000) इतकी होते, जो कोणत्याही कॉर्पोरेट लीडरला दिला गेलेला आतापर्यंतचा सर्वात मोठं पेमेंट आहे.
कंपनीने गुरुवारी (६ नोव्हेंबर २०२५) आपल्या वार्षिक बैठकीत सांगितले की, मतदान करणाऱ्या ७५% हून अधिक भागधारकांनी या अभूतपूर्व वेतन योजनेच्या बाजूने मतदान केले. यापूर्वी, जर त्यांना हे पॅकेज मिळाले नाही, तर आपण कंपनी सोडून देऊ, अशी धमकी मस्क यांनी दिली होती.
हे प्रचंड मोठे पॅकेज एलन मस्क यांना जगातील पहिले खरबपती (Trillionaire) बनवू शकते. याआधी डेलावेअरमधील एका न्यायाधीशांनी मस्क यांची ५६ अब्ज डॉलर्सची (२०१८ मध्ये मंजूर झालेली) मागील भरपाई योजना रद्द केली होती, कारण ती खूप जास्त होती आणि त्यात हिताचे अनेक संघर्ष होते. त्यामुळे टेस्लाच्या बोर्डाने ही ऐतिहासिक वेतन योजना तयार केली.
मस्क यांना हा मोठा पगार पॅकेज इतक्या सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी त्यांना पुढील दशकात कामगिरीचे अनेक मोठे लक्ष्य पूर्ण करावे लागतील. या लक्ष्यांमध्ये १० वर्षांत २ कोटी (२० दशलक्ष) गाड्यांची डिलिव्हरी करणे समाविष्ट आहे. ही संख्या मागील १२ वर्षांत टेस्लाने तयार केलेल्या गाड्यांच्या संख्येच्या दुप्पटहून अधिक आहे. याव्यतिरिक्त, त्यांना कंपनीचे बाजार मूल्य आणि ऑपरेटिंग नफा वाढवावा लागेल. तसेच, १० लाख (१ दशलक्ष) रोबोट्सच्या डिलिव्हरीवर लक्ष ठेवावे लागेल (टेस्लाने अद्याप कोणताही रोबोट वितरित केलेला नाही).
या योजनेची सर्व लक्ष्ये (ज्यामध्ये टेस्लाचे बाजार मूल्य ८.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवणे समाविष्ट आहे) मस्क यांनी पूर्ण केल्यास, ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, टेस्लामध्ये त्यांची एकूण भागीदारी सुमारे २.४ ट्रिलियन डॉलर (सध्याच्या संपत्तीच्या पाचपटाहून अधिक) होईल. त्यांची एकूण संपत्ती बांगलादेश आणि पाकिस्तानसह जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त होईल.