El Chapo Isidro Arrest File Photo
आंतरराष्ट्रीय

El Chapo Isidro: ड्रग्ज तस्करीचा बेताज बादशहा अखेर मेक्सिकोत जेरबंद! अटकेसाठी होते ४६ कोटींचे बक्षीस; कोण आहे एल चापो इसिड्रो?

कुख्यात ड्रग्ज माफिया आणि बेल्ट्रान लेव्हा टोळीचा प्रमुख फॉस्टो इसिड्रो मेजा फ्लोरेस ऊर्फ ‘एल चापो इसिड्रो’ याला मेक्सिकोच्या लष्कराने अटक केली आहे.

मोहन कारंडे

El Chapo Isidro Arrest

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीविरोधातील मोहिमेत मेक्सिकोच्या सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. अमेरिकेच्या एफबीआयच्या सर्वाधिक वाँटेड १० फरार गुन्हेगारांच्या यादीत समावेश असलेला कुख्यात ड्रग्ज माफिया आणि बेल्ट्रान लेव्हा टोळीचा प्रमुख फॉस्टो इसिड्रो मेजा फ्लोरेस ऊर्फ ‘एल चापो इसिड्रो’ याला मेक्सिकोच्या लष्कराने अटक केली आहे.

त्याला पकडण्यासाठी सिनालोआ राज्यातील गुआसावे शहरात रात्रभर विशेष लष्करी मोहीम राबवण्यात आली. त्याच्या अटकेनंतर मेक्सिकोच्या संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडीओही जारी केला आहे. अमेरिकेने त्याच्यावर ५० लाख डॉलर म्हणजेच सुमारे ४६ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

अटकेचा व्हिडीओ समोर

मेक्सिकोच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये एल चापो इसिड्रोला सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेतल्याचे दिसत आहे. त्याचे हात बांधलेले असून, त्याच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्ज सैनिक तैनात आहेत. जवान त्याला एका इमारतीतून बाहेर आणून लष्करी वाहनापर्यंत घेऊन जाताना दिसतात. मिळालेल्या माहितीनुसार, चापो इसिड्रोला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अनेक दिवस गुप्त माहिती गोळा केली होती. त्यानंतर २० नोव्हेंबरच्या रात्री सिनालोआ राज्यातील गुआसावे शहरात विशेष लष्करी मोहीम राबवण्यात आली.

कशी केली लष्करी कारवाई?

मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या मोहिमेत विशेष लष्करी पथके आणि गुप्तचर यंत्रणांनी संयुक्तपणे काम केले. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली माहितीही या कारवाईसाठी महत्त्वाची ठरली. सुरक्षा दलांनी सर्वप्रथम संशयित ठिकाणाची ओळख पटवली. त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला. आरोपींना पळून जाण्याची किंवा बाहेरून मदत मिळण्याची संधी मिळू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, या कारवाईदरम्यान सशस्त्र व्यक्तींनी सैनिकांवर गोळीबार केला तसेच स्फोटकांच्या साहाय्याने हल्ला केला. त्यानंतर लष्कराने प्रत्युत्तर देत संबंधित ठिकाणी प्रवेश केला. या कारवाईत चापो इसिड्रोसह तीन प्रमुख व्यक्तींना अटक करण्यात आली.

चकमकीत ११ जणांचा मृत्यू

या मोठ्या लष्करी मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि कथित गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या गोळीबारात टोळीच्या सात संशयित सदस्यांचा, तर मेक्सिकोच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या हिंसक कारवाईत एकूण ११ जणांना जीव गमवावा लागला. या कारवाईनंतर सिनालोआ राज्यातील अनेक भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले. गुआसावे, अहोमे, गुआमुचिल आणि नावोलातो या भागांत रस्ते अडवणे, वाहनांना आग लावणे आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. सुरक्षा दलांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांनी अनेक ठिकाणी वाहतूक रोखली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले.

कोण आहे एल चापो इसिड्रो?

फॉस्टो इसिड्रो मेजा फ्लोरेस हा मेक्सिकोतील सर्वात धोकादायक ड्रग्ज माफियांपैकी एक मानला जातो. तो सुरुवातीला बेल्ट्रान लेव्हा या कुख्यात गुन्हेगारी टोळीशी संबंधित होता. पुढे त्याने मेजा-फ्लोरेस या गुन्हेगारी संघटनेचे नेतृत्व स्वीकारले. अमेरिकेच्या तपास यंत्रणांच्या आरोपांनुसार, त्याची संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर अमली पदार्थांची तस्करी करणारे मोठे नेटवर्क चालवत होती. या नेटवर्कच्या माध्यमातून कोकेन, हेरॉईन, मेथॅम्फेटामाइन, फेंटानिल आणि गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात होती. सिनालोआ राज्यातील गुआसावे, लॉस मोचिस आणि आसपासच्या डोंगराळ भागांत या संघटनेचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मेक्सिको आणि अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांसाठी ही संघटना मोठे आव्हान ठरली होती.

अमेरिकेने ठेवले होते ५० लाख डॉलरचे बक्षीस

अमेरिकेच्या तपास यंत्रणा अनेक वर्षांपासून चापो इसिड्रोच्या मागावर होत्या. एफबीआयने त्याचा समावेश अमेरिकेतील सर्वाधिक वाँटेड १० फरार गुन्हेगारांच्या यादीत केला होता. त्याला अटक करण्यात किंवा दोषी ठरवण्यात मदत करणारी माहिती देणाऱ्यास अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ५० लाख डॉलरपर्यंतचे बक्षीस जाहीर केले होते. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या माहितीनुसार, अमली पदार्थांची तस्करी, मनी लॉन्ड्रिंग, गुन्हेगारी संघटना चालवणे, दहशतवादी संघटनेला मदत करणे आणि बेकायदा शस्त्रांचा वापर करणे अशा अनेक गंभीर आरोपांखाली त्याच्याविरोधात खटले दाखल आहेत. या आरोपांमध्ये दोषी ठरल्यास त्याला जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे त्याची अटक ही केवळ मेक्सिकोसाठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमली पदार्थविरोधी मोहिमेसाठीही महत्त्वाची मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT