Dutch Royal Family assassination plot
द हेग (नेदरलँड) : डच राजघराण्यावर पुन्हा एकदा दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. राजकुमारी कॅथरिना-अमेलिया (२२) आणि तिची धाकटी बहीण राजकुमारी ॲलेक्सिया (२०) यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका ३३ वर्षीय कट्टरपंथीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
'न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेला संशयित कट्टर उजव्या विचारसरणीचा असून तो नाझी विचारांनी प्रेरित होता. फेब्रुवारी महिन्यात 'द हेग' येथून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. सोमवारी (दि. ४ मे) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास यंत्रणांना त्याच्याकडे दोन कुऱ्हाडी सापडल्या असून, त्यावर "ॲलेक्सिया", "मोसाद" आणि नाझी काळातील अभिवादन "सीग हेल" असे शब्द कोरलेले होते. त्याच्याकडे एक हस्तलिखित चिठ्ठीही सापडली, ज्यामध्ये अमेलिया, ॲलेक्सिया यांची नावे आणि "रक्तपात" असा उल्लेख होता.
द हेग सार्वजनिक फिर्यादी कार्यालयाने गोपनीयतेच्या कायद्याचा हवाला देत संशयिताची ओळख उघड केलेली नाही. तसेच, या हत्येच्या कटामागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. २७ एप्रिल रोजी 'किंग्स डे' निमित्त राजघराणे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
नेदरलँड राजघराण्याची वारसदार असलेल्या राजकुमारी अमेलियाला धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अमली पदार्थांच्या तस्करांनी अमेलिया आणि तत्कालीन पंतप्रधान मार्क रट्टे यांच्या अपहरणाचा कट रचला होता. एका व्यक्तीने तिला बलात्कार आणि हिंसाचाराची धमकी दिली होती. त्यामुळे काही काळ तिला सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागले ोते. तिला ॲमस्टरडॅममधील तिचे विद्यार्थी निवासस्थान सोडून राजवाड्यात परतावे लागले होते. २०२४ मध्ये सुरक्षिततेसाठी ती गुप्तपणे स्पेनमधील माद्रिद येथे शिक्षणासाठी गेली होती.
"ती आता ॲमस्टरडॅममध्ये राहू शकत नाही आणि राजवाड्याच्या बाहेरही पडू शकत नाही. तिच्या आयुष्यावर याचे खूप गंभीर परिणाम झाले आहेत," असे राणी मॅक्सिमा यांनी आपल्या मुलीच्या परिस्थितीबद्दल बोलताना सांगितले. राजकुमारी अमेलियानेही आपली खंत व्यक्त करताना म्हटले होते की, "मला सामान्य आयुष्याची ओढ लागली आहे. एका सामान्य विद्यार्थिनीसारखे रस्त्यावरून चालणे किंवा दुकानात जाणे, या गोष्टी मी आता करू शकत नाही."