Australian Muslim Senator Fatima Payman
कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया): ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील पहिल्याच हिजाबधारी मुस्लिम खासदार फातिमा पायमन यांनी केलेल्या एका गंभीर, सनसनाटी आरोपांमुळे ऑस्ट्रेलियन संसद पुन्हा चर्चेत आली आहे.
एका वयोवृद्ध सहकारी खासदाराने फातिमा यांना एका अधिकृत कार्यक्रमात वाईन पिण्यास आणि टेबलवर चढून नाचण्यास उद्युक्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
30 वर्षीय फातिमा पायमन यांनी ABC या राष्ट्रीय प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, "त्या सहकाऱ्याने खूप मद्यप्राशन केले होते आणि मग तो मला म्हणाला की, 'चल, थोडी वाईन घे आणि टेबलवर नाच'."
पायमन यांनी स्पष्ट केले की त्या मद्यपान करत नाहीत आणि त्यांनी त्या सहकाऱ्याला तत्काळ उत्तर दिले की, "इथंच मर्यादा पाळ, मित्रा'." त्यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार नोंदवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही घटना नेमकी कधी घडली आणि तो सहकारी खासदार कोण होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
फातिमा पायमन यांचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला असून, त्या ऑस्ट्रेलियन संसदेतील पहिल्या हिजाब परिधान करणाऱ्या खासदार आहेत. 2024 मध्ये त्यांनी लेबर पक्षाशी संबंध तोडून स्वतंत्र खासदार म्हणून काम सुरु केले.
त्यांनी लेबर सरकारवर गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांना मदत करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, या प्रकारामुळे Brittany Higgins प्रकरणानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संसदेमधील वातावरणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
2021 मध्ये Brittany Higgins या माजी राजकीय कर्मचाऱ्याने संसद भवनात आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती.
त्यानंतर आलेल्या एका अहवालात असे निष्कर्ष काढण्यात आले की, संसदेमध्ये मद्यपान, छळवणूक आणि लैंगिक शोषण हे प्रकार फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
फातिमा पायमन यांच्या या तक्रारीनंतर पुन्हा एकदा संसदेमधील शिष्टाचार आणि सुरक्षिततेच्या बाबतीत कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.
ऑस्ट्रेलियात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज (House of Representatives) मध्ये 150 सदस्य आणि सिनेट (Senate) मध्ये 76 सदस्य आहेत. असे मिळून ऑस्ट्रेलियाच्या फेडरल संसदेत एकूण 226 सदस्य आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील मुस्लिम खासदारांची संख्या 7 आहे.
पैकी एड हुसीच, अॅनी अली, फातिमा पायमन, बासेम अब्दो असे चार मुस्लीम खासदार फेडरल संसदेत आहेत. तर राज्य संसदेत बिस्मा आसिफ, नताली सुलेमान, मिरा एल डॅनावी हे तीन खासदार आहेत.