donald trump us stock market pudhari
आंतरराष्ट्रीय

donald trump us stock market: डॉनल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ! इराण-अमेरिका युद्धावेळी शेअर मार्केटमध्ये 'मोठा' खेळ

Anirudha Sankpal

donald trump us stock market controversy: एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने इराणला धमकावत मध्य पूर्वेतील (मिडल ईस्ट) तणाव वाढवताना दिसत आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेचा शेअर बाजार म्हणजेच 'वॉल स्ट्रीट' त्यांच्यासाठी नव्या अडचणींचे कारण ठरला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत केलेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरील शेअर व्यवहारांमुळे ते सध्या एका मोठ्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

दररोज सरासरी ४० हून अधिक सौदे

'ब्लूमबर्ग'ने प्रसिद्ध केलेल्या एका धक्कादायक अहवालानुसार, या वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्यांत (जानेवारी ते मार्च) डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांच्या सल्लागारांनी ३,७०० पेक्षा जास्त स्टॉक ट्रेड (खरेदी-विक्री) केले आहेत. २०२५ च्या शेवटच्या तीन महिन्यांत केवळ ३८० सौदे झाले होते, त्या तुलनेत या तिमाहीत झालेली वाढ थक्क करणारी आहे. या कालावधीत ट्रम्प यांनी दररोज सरासरी ४० हून अधिक व्यावसायिक सौदे केले आहेत.

बड्या कंपन्यांमध्ये कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल

या वित्तीय खुलाशांनुसार, ट्रम्प यांनी जगातील आघाडीच्या आयटी, फायनान्स, एयरोस्पेस आणि मीडिया कंपन्यांमध्ये कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक आणि विक्री केली. त्यांनी NVIDIA, Microsoft, Boeing, Oracle, आणि Costco सारख्या कंपन्यांमध्ये प्रत्येकी किमान १ दशलक्ष (१० लाख) डॉलर्सचे शेअर्स खरेदी केले. याशिवाय ॲमेझॉन, मेटा, उबर, इबे आणि एटी अँड टी सारख्या कंपन्यांमध्येही मोठे व्यवहार झाले. १० फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि ॲमेझॉनमधील आपली ५ दशलक्ष ते २५ दशलक्ष डॉलर्सची भागीदारी विकली, जो या तिमाहीतील सर्वात मोठा व्यवहार मानला जात आहे.

'हे सामान्य नाही...' – बाजार तज्ज्ञ चक्रावले

एका विद्यमान राष्ट्राध्यक्षाने अशा पद्धतीने अब्जावधींच्या शेअर्सची उलाढाल करणे अत्यंत असामान्य असल्याचे मत बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मॅथ्यू टटल (सीईओ, टटल कॅपिटल मॅनेजमेंट): "ही व्यवहारांची संख्या अविश्वसनीय आहे. हे एखाद्या हेज फंडसारखे किंवा मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अल्गोरिदम ट्रेडिंगसारखे वाटते."

एरिक डिटन (चेअरमन, द वेल्थ एलायंस): "वॉल स्ट्रीटवरील माझ्या ४० वर्षांपेक्षा जास्त अनुभवात मी कोणत्याही राष्ट्राध्यक्षाचे असे व्यवहार पाहिले नाहीत. हे कोणत्याही निकषाने सामान्य ट्रेडिंग नाही."

हितांचा संघर्ष आणि टीकेची झोड

या खुलाशांमुळे ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हितसंबंधांच्या संघर्षावरून (Conflict of Interest) जोरदार टीका होत आहे. ट्रम्प यांनी ज्या कंपन्यांचे शेअर्स ट्रेड केले, त्यातील बहुतांश कंपन्या थेट अमेरिकन सरकारच्या धोरणांवर आणि भू-राजकीय निर्णयांवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, एनव्हिडियाला (Nvidia) चीनमध्ये एआय चिप्स निर्यात करण्यासाठी सरकारी मंजुरीची गरज असते, तर बोईंग (Boeing) कंपनी पूर्णपणे सरकारी संरक्षण करारांवर चालते.

इतर माजी राष्ट्राध्यक्षांप्रमाणे ट्रम्प यांनी आपले व्यावसायिक हितसंबंध पूर्णपणे सोडले नाहीत किंवा ते एका 'ब्लाइंड ट्रस्ट'कडे सोपवले नाहीत. सध्या त्यांच्या या व्यवसायांची देखरेख त्यांची मुले (ट्रम्प ऑर्गनायझेशन) करत आहेत, ज्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

व्हाईट हाऊस आणि ट्रम्प ऑर्गनायझेशनचा दावा

या सर्व आरोपांवर व्हाईट हाऊसने प्रतिक्रिया देत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गडबड झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. दुसरीकडे, ट्रम्प ऑर्गनायझेशनच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, "या सर्व गुंतवणुकीचे व्यवस्थापन बाहेरील वित्तीय संस्थांद्वारे स्वतंत्रपणे केले जाते. डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांचे कुटुंबीय वैयक्तिकरित्या या व्यवहारांचे नियंत्रण करत नाहीत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT