Donald Trump on India Pakistan tensions
दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सौदी अरेबियातील भाषणात स्वतःचे शांततावादी म्हणून वर्णन करत तणाव कमी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने "एकत्र छान जेवण करावे" असा अजब सल्ला दिला. तसेच त्यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, असा दावा केला आहे.
सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या उपस्थितीत सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे झालेल्या यूएस-सौदी गुंतवणूक मंचाला डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधित केले. यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्ध टाळण्यासाठी शांततेत मध्यस्थी करण्यास मदत केली, ज्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला असता, असा पुनरुच्चार केला.
ट्रम्प पुढे म्हणाले की, उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि सचिव रुबियो यांच्यातील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील शांतता चर्चेनंतर नवी दिल्ली आणि इस्लामाबाद खरोखर एकत्र येत आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होत आहे. आम्ही दोघांना सांगितलं अण्वस्त्रांचा व्यापार नको, पण तुमचं जे उत्पादन आहे त्याचा व्यापार करा. ट्रम्प यांनी दावा केला की त्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये संभाव्य अण्वस्त्रयुद्ध टाळण्यासाठी ऐतिहासिक शस्त्रसंधी घडवून आणली. या संघर्षात कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, पण आम्ही हस्तक्षेप करून तो थांबवला.
भारताने याआधीच स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानसोबतची शस्त्रसंधी ही थेट लष्करी चर्चेतून घडवून आणलेली असून, कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी मान्य केलेली नाही. तरीही ट्रम्प यांनी स्वतःच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत, "मी सांगितलं, व्यवहार करूया, अण्वस्त्र नकोत, डिनर करा” असं म्हटलं. ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावरही मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता, पण भारताने तो स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. भारताची भूमिका कायम स्पष्ट आहे, काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला जाईल.
ऑपरेशन सिंदूर नंतर १० मे रोजी एका ट्रम्प यांनी घोषणा केली की भारत आणि पाकिस्तान 'युद्धविराम'वर पोहोचले आहेत, ज्यामुळे २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या लष्करी हालचाली थांबल्या. दोन्ही देशांनी या घडामोडींना दुजोरा दिला असला तरी, भारताने स्पष्ट केले की चर्चा थेट लष्करी पातळीवर झाली आहे.