Donald Trump on India & Russia economy
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियावर जोरदार टीका करताना म्हटले की, "माझं काहीच जात नाही, भारत रशियासोबत काय करतो. ते दोघं मिळून त्यांच्या 'मृत अर्थव्यवस्था' घेऊन बुडू शकतात."
ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारत सरकारने या मुद्द्याची गंभीर दखल घेतली असून, "त्याचे परिणाम अभ्यासात आहोत," असं अधिकृतपणे जाहीर केलं आहे.
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर म्हटले आहे की, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्था आधीच मृतप्राय आहेत आणि हे दोन्ही देश मिळून त्या आणखी खाली घेऊन जात आहेत. मला काही फरक पडत नाही की भारत रशियासोबत काय करतो.
बुधवारी अमेरिकेने भारतातून येणाऱ्या अनेक वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क लागू केल्याची घोषणा केली होती. यानंतर आता ट्रम्प यांनी Truth Social या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट भारताच्या रशियासोबत असलेल्या व्यापारावर हल्ला चढवला.
"भारत आपला बहुतांश संरक्षण साहित्य रशियाकडूनच खरेदी करतो. रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्यांमध्ये भारत आणि चीन हे आघाडीवर आहेत. जेव्हा संपूर्ण जग रशियाला युक्रेनमधील युद्ध थांबवायला सांगत आहे, तेव्हा भारत मात्र उलट दिशेने जात आहे," असं ट्रम्प म्हणाले.
रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेच्या ‘अल्टिमेटम गेम’ वर प्रतिक्रिया देताना "हे युद्धाच्या दिशेने नेणारी पावले आहेत," असं म्हटलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "मेदवेदेव, जो स्वतःला अजूनही राष्ट्राध्यक्ष समजतो, त्याने स्वतःची मर्यादा ओळखावी. तो फारच धोकादायक वळणावर आहे."
ट्रम्प यांच्या भारतविरोधी धोरणाची दुसरी बाजू म्हणजे पाकिस्तानसोबतचा नवीन करार. ट्रम्प यांनी म्हटलं की, "आम्ही पाकिस्तानसोबत करार केला आहे. दोन्ही देश मिळून पाकिस्तानमधील तेल साठे विकसित करतील. लवकरच त्या प्रकल्पासाठी तेल कंपनीची निवड होईल."
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने निवेदन देऊन सांगितले की, "भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून एक न्याय्य, संतुलित आणि परस्पर फायद्याचा व्यापार करार करण्याबाबत चर्चा सुरू आहे. आम्ही आमच्या शेतकऱ्यांचे, उद्योजकांचे आणि लघु-मध्यम उद्योगांचे हित जपण्यासाठी कटीबद्ध आहोत."
सरकारने हेही स्पष्ट केलं की, यापूर्वी यूकेसोबत झालेल्या ‘Comprehensive Economic and Trade Agreement’ प्रमाणेच, भारत आपला राष्ट्रीय हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यांमुळे जागतिक व्यापार आणि राजनैतिक संबंधात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.