France Student Protests Pudhari
आंतरराष्ट्रीय

France Student Protests: फ्रान्समध्ये लाखोंचा उद्रेक; ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ, म्हणाले- ‘इस्लामला देश ताब्यात घ्यायचा आहे!’

France Student Protests: फ्रान्समध्ये शिक्षणासाठी अधिक निधीच्या मागणीवरून सुरू झालेले विद्यार्थी आंदोलन देशभर पसरले असून लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

Rahul Shelke

France Student Protests: फ्रान्समध्ये शिक्षणासाठी अधिक निधी द्यावा आणि शाळांमध्ये चांगल्या सुविधा द्याव्यात या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. या आंदोलनावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फ्रान्समधील परिस्थितीला ‘मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर’ आणि ‘इस्लामला देशावर ताबा मिळवायचा’ असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘Truth Social’ वर पोस्ट करत फ्रान्समधील परिस्थितीवर भाष्य केले. “फ्रान्समध्ये जे काही घडत आहे, ते नियंत्रणाबाहेर गेलेल्या स्थलांतराचे उदाहरण आहे. हा प्रश्न केवळ शाळांचा नाही, तर इस्लामला फ्रान्सवर ताबा मिळवायचा आहे,” असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, फ्रान्समध्ये मंगळवारी झालेल्या देशव्यापी आंदोलनात तब्बल २ लाख ६६ हजारांहून अधिक लोक सहभागी झाले. फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, केवळ पॅरिसमध्ये सुमारे ५६ हजार नागरिक रस्त्यावर उतरले होते. सप्टेंबरच्या मध्यात पॅरिसजवळील एका शाळेतून सुरू झालेले हे आंदोलन आता देशभर पसरले आहे.

विद्यार्थ्यांची मुख्य मागणी शिक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची आहे. गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन करत शाळांवर बहिष्कार टाकला आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाळांचे प्रवेशद्वारही अडवले आहेत.

पॅरिसमधील आंदोलन सुरुवातीला शांततेत सुरू होते. मात्र, काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. फ्रान्सच्या गृह मंत्रालयानुसार, जवळपास ५०० जणांना ताब्यात घेण्यात आले.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आंदोलन सुरू झाल्यापासून पोलिसांनी ६,५०० हून अधिक जणांना अटक केली आहे. यातील बहुतांश जण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले आहे. किशोरवयीन विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, लाठी आणि इतर नियंत्रणात्मक साधनांचा वापर केल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून पोलिसांच्या कारवाईवर टीका होत आहे.

काही विद्यार्थी संघटनांनी गुरुवारी पुन्हा आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे फ्रान्समधील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फ्रान्सचे गृहमंत्री लॉराँ न्युनेझ यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. बहुतांश ठिकाणी पोलिसांची कारवाई परिस्थितीच्या तुलनेत योग्य होती, असा दावा त्यांनी केला. आंदोलन हिंसक झालेल्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान सेबॅस्तियाँ लेकोर्नू यांनी मात्र विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज व्यक्त केली. सरकार आणि शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी म्हटले. त्याचवेळी शाळांच्या आसपास झालेल्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध केला. पोलिसांच्या कारवाईत वंशभेद झाल्याचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले.

या आंदोलनामुळे फ्रान्सच्या आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. शिक्षणाच्या प्रश्नाबरोबरच सरकारी खर्च, गरिबी आणि श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढती दरी याबाबतही नागरिकांमध्ये नाराजी आहे. इराणमधील युद्धामुळे वाढलेल्या इंधनाच्या किमतींमुळे या नाराजीत आणखी भर पडली आहे.

दरम्यान, सोमवारी पोलिसांच्या स्टन ग्रेनेडच्या घटनेत एका १५ वर्षीय मुलाला हात गमवावा लागला. या घटनेनंतरही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, गृहमंत्री न्युनेझ यांच्या म्हणण्यानुसार, या आंदोलनादरम्यान आतापर्यंत ७१५ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलन आता केवळ शिक्षणाच्या प्रश्नापुरते मर्यादित राहिलेले नाही. वाढती महागाई, इंधनाचे दर, सरकारी धोरणे, सामाजिक विषमता आणि स्थलांतराचा मुद्दा यामुळे या आंदोलनाला व्यापक राजकीय रंग मिळत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT