Donald Trump Pudhari
आंतरराष्ट्रीय

Donald Trump: 'आपण भारताकडून शिकलं पाहिजे'; डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्ञानेश कुमारांचं नाव घेत निवडणूक आयोगाचं केलं कौतुक

Trump Praises India Election System: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थेचे कौतुक करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा उल्लेख केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Trump Praises India Election System: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक व्यवस्थेचे कौतुक केले आहे. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदारांची ओळख तपासली जावी, यासाठी ट्रम्प ‘SAVE America Act’ला पाठिंबा देत आहेत.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘Truth Social’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा उल्लेख केला. भारतात मतदारांच्या ओळखीसाठी फोटो असलेले वैध ओळखपत्र वापरले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकेतील मतदान व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणूक कशी घेतली जाऊ शकते, असा प्रश्न त्यांनी विचारल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

भारताच्या मोठ्या निवडणूक प्रक्रियेचा संदर्भ देताना ट्रम्प यांनी मागील लोकसभा निवडणुकीतील सुमारे 64.6 कोटी मतदारांचा उल्लेख केला. त्याचबरोबर भारतातील मतदारांसाठी फोटो असलेल्या ओळखपत्राची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

‘भारताकडून अमेरिकेने शिकावे’

अमेरिकेत मतदानासाठी फोटो असलेले ओळखपत्र आणि नागरिकत्वाचा पुरावा अधिक कठोरपणे लागू करण्याची ट्रम्प यांची मागणी आहे. यासाठी ‘SAVE America Act’ मंजूर करण्याचे आवाहन ते करत आहेत. भारताच्या निवडणूक व्यवस्थेचा उल्लेख करून अमेरिकेतील मतदान प्रक्रिया अधिक कडक करण्याच्या आपल्या भूमिकेला समर्थन मिळवण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेचे भारतातील राजदूतही ट्रम्प यांच्या समर्थनात

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनीही ट्रम्प यांच्या वक्तव्याला समर्थन दिले. भारतातील मोठ्या निवडणूक प्रक्रियेत मतदार ओळखीसाठी असलेल्या व्यवस्थेचा त्यांनी उल्लेख केला आणि अमेरिकन काँग्रेसने ‘SAVE America Act’ मंजूर करावा, असे आवाहन केले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेची तुलना पुन्हा चर्चेत आली आहे.

ज्ञानेश कुमार कोण आहेत?

ज्ञानेश कुमार हे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. ट्रम्प यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाचे प्रमुख असलेले ज्ञानेश कुमार अमेरिकेतही चर्चेत आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT