Donald Trump file photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump: 'इराण युरेनियमचा साठा सोपवण्यास तयार': ट्रम्प यांचा मोठा दावा

इराण आपल्याकडील समृद्ध युरेनियमचा साठा सोपवण्यास तयार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

मोहन कारंडे

Donald Trump

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी एक खळबळजनक दावा केला असून, इराण आपल्याकडील समृद्ध युरेनियमचा साठा सोपवण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, इराणने अद्याप असा कोणताही करार झाल्याचे स्पष्ट केलेले नाही.

एएफपी आणि रॉयटर्स या वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, इराण आता अणुकार्यक्रमाबाबत मोठ्या कराराच्या उंबरठ्यावर आहे. इराणने पुढील २० वर्षांहून अधिक काळ अण्वस्त्रे विकसित न करण्याचे आश्वासन दिले असून जवळपास सर्व अटी मान्य केल्या आहेत, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

या संभाव्य करारावर 'इस्लामाबाद'मध्ये अंतिम शिक्कामोर्तब झाल्यास, आपण स्वतः तिथे उपस्थित राहू शकतो, असे संकेतही ट्रम्प यांनी दिले. मात्र, दुसरीकडे इराणने आपली भूमिका कायम राखली आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी करारांतर्गत युरेनियम संवर्धन हा आपला वैध अधिकार असल्याचे सांगत, इराणने कोणत्याही तडजोडीचे वृत्त नाकारले आहे. कोणत्याही अंतिम निर्णयापूर्वी सर्वसमावेशक आराखड्यावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे इराणने स्पष्ट केले.

इस्रायल-लेबनॉन युद्धविराम लागू

दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान गुरुवारी संध्याकाळपासून युद्धविराम लागू झाल्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्याशी प्रदीर्घ चर्चेनंतर हा तोडगा निघाल्याचे त्यांनी सांगितले.

द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी ट्रम्प यांनी नेतन्याहू आणि जोसेफ आऊन या दोन्ही नेत्यांना 'व्हाईट हाऊस'मध्ये आमंत्रित केले आहे. १९८३ नंतर प्रथमच अशा प्रकारची अर्थपूर्ण द्विपक्षीय चर्चा होणार असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT