अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प . Pudhari
आंतरराष्ट्रीय

Donald Trump : 'हा मला आवडणारा आकडा नाही...': वयाची ८० वर्षे पूर्ण करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'नाराज'!

ट्रम्‍प यांच्‍या वाढदिवसावर इराणबरोबर संघर्षाचे सावट

पुढारी वृत्तसेवा

Donald Trump 80th birthday : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज (दि. १४ जून) ८० वर्षांचे झाले. मात्र, वयाचा हा टप्पा गाठल्याचा त्यांना विशेष आनंद झालेला नाही. "८० हा आकडा मला आवडत नाही," अशी कबुली खुद्द ट्रम्प यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी 'सेंटर्स फॉर मेडिकेयर अँड मेडिकेड सर्व्हिसेस'चे प्रशासक डॉ. मेहमेट ओझ यांच्याशी बोलताना सांगितले होते की, आपण ८० वर्षांचे होण्यास उत्सुक नाही.

तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची गरज नाही...

'यूएसए टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प म्हणाले, "तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची गरज नाही, कारण या वाढदिवसामुळे मी अजिबात आनंदी नाही. मी या आकड्याचा (८० वर्षे) कधी फारसा विचार केला नव्हता. हा मला आवडणारा आकडा नाही, पण तरीही मी इथे आहे." ११ जून रोजी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या एका संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे, याच दिवशी डॉ. ओझ यांचाही ६६ वा वाढदिवस होता.

व्हाईट हाऊस बनले 'युएफसी' आखाडा

वाढदिवसाबद्दल नाराजी असली, ट्रम्प यांनी हा प्रसंग मोठ्या थाटामाटात साजरा केला. त्यांनी थेट व्हाईट हाऊसच्या आवारातच एका भव्य 'अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप' (UFC) स्पर्धेचे आयोजन केले होते. यासाठी राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानाला तात्पुरत्या 'मिक्स्ड मार्शल आर्ट्स' आखाड्याचे स्वरूप देण्यात आले होते.UFC चे अध्यक्ष दाना व्हाईट यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेत सात सामने खेळवले गेले. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता, योगायोगाने 'फ्लॅग डे'च्या (ध्वज दिन) दिवशीच आला.

ट्रम्‍प यांच्‍या वाढदिवसावर इराणबरोबर संघर्षाचे सावट

ट्रम्प यांचा हा वाढदिवस अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिकेसमोर राजकीय आव्हाने आहेत आणि इराणसोबतचा संघर्षाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. शांतता कराराबाबत ट्रम्प वारंवार दावा करत असले, तरी संभाव्य करारातील मुख्य मुद्द्यांवर अजूनही एकमत झालेले नाही. न्यायालयाच्या एका निर्णयामुळे व्हाईट हाऊसपासून काही अंतरावर असलेल्या 'केनेडी सेंटर'वरून ट्रम्प यांचे नाव हटवण्यात आले. या घटनेमुळेही वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवर काहीसे सावट पसरले होते.

बायडेन यांच्या वाढदिवसाशी तुलना

ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्‍या सोहळ्याची तुलना माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ८० व्या वाढदिवसाशी केली जात आहे. बायडेन यांनी २०२२ मध्ये आपला ८० वा वाढदिवस व्हाईट हाऊसमध्ये अत्यंत साधेपणाने, कुटुंबासोबत कौटुंबिक ब्रंच (दुपारचे जेवण) घेऊन साजरा केला होता. आता ट्रम्‍प यांच्‍या ८० वा वाढदिवसाची बायडेन यांच्‍या वाढदिवसाशी तुलना केली जात आहे.

वाढदिवसाच्‍या सोहळ्यावर विरोधकांची टीका

वाढदिवसाच्‍या भव्य सोहळ्यावर विरोधक आणि विश्लेषकांकडून जोरदार टीका होत आहे. इराण संघर्ष, वाढती महागाई आणि ट्रम्प यांची घसरणारी लोकप्रियता यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा घाट घातल्याचा आरोप केला जात आहे. 'असोसिएटेड प्रेस'ने दिलेल्‍या वृतानुसार, माईक फॉन्टेन यांनी या सोहळ्याची तुलना प्राचीन रोममधील 'ग्लॅडिएटर्स'च्या (योद्ध्यांच्या) जीवघेण्या खेळांशी केली. ते म्हणाले, "हे सर्व लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. ही एक जुनी रणनीती आहे. प्राचीन रोममध्ये यासाठी 'ब्रेड अँड सर्किसेस' (लोकांना खाऊ घालून आणि मनोरंजन करून मुख्य मुद्द्यांपासून दूर ठेवणे) अशी म्हण होती."हा सर्व खर्च 'UFC' करत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला असला, तरी 'नॅशनल पार्क सर्व्हिस'च्या न्यायालयातील कागदपत्रांनुसार, या तयारीसाठी तब्बल ६० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ५०० कोटी रुपये) खर्च झाले असून, अनेक सरकारी यंत्रणांचे हजारो तास यात वाया गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT