आंध्र प्रदेशातील दासारी गोपीकृष्ण हा आठ महिन्यांपूर्वी ‍नोकरीसाठी अमेरिकेत गेला होता.   X
आंतरराष्ट्रीय

कोण आहे दासारी गोपीकृष्ण?; ज्याचा अमेरिकेतील गोळीबारात मृत्यू

सुपरमार्केटमध्ये अंधाधुंद गोळीबार, व्हिडिओ आला समोर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी न्यूज नेटवर्क

अमेरिकेतील अर्कान्सास येथील एका सुपरमार्केटमध्ये २१ जून रोजी गोळीबार झाला होता. त्यात ४ जणांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील एका ३२ वर्षीय भारतीय व्यक्तीचा समावेश आहे. दासारी गोपीकृष्ण असे त्याचे नाव आहे.

याआधी या गोळीबाराच्या घटनेत ४ जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली होती, तर अनेक जण जखमी झाले होते. सुमारे ३,२०० लोकसंख्या असलेल्या फोर्डिस शहरातील मॅड बुचर स्टोअरमध्ये शुक्रवारी गोळीबार झाला. अर्कान्सास राज्य पोलिस डायरेक्टर माईक हागर यांनी याबाबत पुष्टी केली होती की पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात संशयितदेखील जखमी झाला.

कोण आहे दासारी गोपीकृष्ण?

गोपीकृष्णला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा गेल्या रविवारी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बापटला जिल्ह्यातील याजली, कार्लापलेम मंडल येथे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. ८ महिन्यांपूर्वी नोकरीसाठी अमेरिकेत गेलेला दासारी तेथील सुपरमार्केटमध्ये काम करत होता. दासारी गोपीकृष्ण यांच्या पश्चात त्याची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

अंधाधुंद गोळीबार, व्हिडिओ आला समोर

गोपीकृष्ण सुपरमार्केटमध्ये चेक-आउट काउंटरवर काम करत असताना सकाळी ११.३० च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. अज्ञात हल्लेखोराने दुकानात घुसून गोळीबार केला. त्यात गोपीकृष्ण गंभीर जखमी झाला होता. एका सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये बंदूकधारी व्यक्ती गोपीकृष्णवर गोळीबार करताना दिसत आहे. त्यानंतर तो जागेवरच कोसळला. दरम्यान, हल्लेखोर नंतर काउंटरवर उडी मारतो आणि स्टोअरमधून काहीतरी उचलतो.

हल्लेखोराला अटक

या प्रकरणी पोलिसांनी ४४ वर्षीय संशयित हल्लेखोर ट्रॅव्हिस यूजीन पोसी याला अटक केली आहे. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्याकांडाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

भारतीय वाणिज्य दूतावासाकडून दुःख व्यक्त

अमेरिकेच्या ह्यूस्टन येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी X ‍वर पोस्ट करत म्हटले आहे, "प्लेजंट ग्रोव्ह, डल्लास, टेक्सास येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत भारतीय नागरिक गोपीकृष्ण दासारी यांचे निधन झाल्याचे ऐकून खूप दु:ख झाले. आम्ही त्याच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो."

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, "अमेरिकेतील गोळीबाराच्या घटनेत जखमी झाल्यामुळे बापटला येथील दासारी गोपीकृष्ण या तरुणाचा मृत्यू झाला, हे ऐकून अतिशय दु:ख झाले. मी त्याच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना खात्री देतो की त्याचे पार्थिव घरी आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT