Crude Oil 
आंतरराष्ट्रीय

इस्रायल- इराण संघर्षामुळे कच्चे तेल भडकले! भारतावर काय होणार परिणाम?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु झाल्याने कच्च्या तेलाचे दर (Crude Oil prices) भडकले आहेत. मध्य पूर्वेत तणाव वाढल्याने तेलाच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मंगळवारी दोन्ही क्रूड बेंचमार्क ५ टक्क्यांनी वाढले. त्यानंतर ते सुमारे २.५ टक्क्यांनी वाढून बंद झाले होते. तर बुधवारी ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ७४.५५ डॉलरवर पोहोचला.

इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर (Iran Attacks Israel) १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, इस्रायलने अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला. इराणने मोठी चूक केली असून त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा गंभीर इशारा इस्रायल आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी इराणला दिला आहे. यामुळे मध्य पूर्वेत व्यापक युद्धाची भीती (Middle East tensions) व्यक्त करण्यात आली आहे.

Crude Oil prices : कच्चे तेल ७५ डॉलरवर

मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे मंगळवारी वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) च्या किमतीत ५ टक्क्यांची वाढ झाली. हे याआधी २.७ टक्क्यांनी वाढले होते. यामुळे दर प्रति बॅरल ७१ डॉलरच्या पुढे गेला. तर ब्रेंट क्रूडचा जागतिक बेंचमार्क प्रति बॅरल ७५ डॉलरवर पोहोचला. इराण हा तेल निर्यातदार देशांची संघटना ओपेकचा सदस्य आहे. तसेच तो मध्य पूर्वेतील प्रमुख देश आहे. मध्य पूर्वेतील संघर्षात इराणचा सहभाग असल्याने आता जगातील एक तृतीयांश कच्च्चा तेलाचा पुरवठा करणाऱ्या या प्रदेशातून तेल पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पेट्रोल- डिझेल दरावर होणार परिणाम?

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घसरण झाली होती. यामुळे भारतात पेट्रोल- डिझेल स्वस्त होण्याची आशा व्यक्त करण्यात आली होती. कारण भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेलाचा वापर करणारा आणि आयात करणारा देश आहे. गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरण झाली असतानाही भारतात गेल्या काही वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलचे चढे दर कायम राहिले आहेत. कच्च्या तेलाचे (West Asia conflictcrude oil prices) दर दीर्घकाळ कमी राहिल्यास तेल कंपन्या इंधनाच्या किमतीत कपात करण्याचा विचार करतील, असे याआधी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांनी म्हटले होते. पण आता चित्र अचानक बदलले असून इराण- इस्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील वाढीचा भारतातील पेट्रोल- डिझेल दरावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल- डिझेल दर कसे ठरतात?

भारतातील पेट्रोल- डिझेलच्या किमती (Petrol Diesel Prices) आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराचा आढावा घेतल्यानंतर भारतीय तेल विपणन कंपन्या नियमितपणे पेट्रोल- डिझेलचे दर निश्चित करतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT