Covid-19 Hong Kong Singapore Updates
नवी दिल्ली : काही काळ शांत राहिल्यानंतर, हाँगकाँग आणि सिंगापूरसह अनेक आशियाई प्रदेशांमध्ये पुन्हा एकदा कोविड-१९ संसर्गाचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची पुन्हा एकदा भिती निर्माण झाली आहे. भारतात कोविडच्या तीव्र लाटेची शक्यता कमी असली तरी, सतर्क राहणे ही शहाणपणाची खबरदारी आहे, असे विषाणूशास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ञांनी म्हटले आहे.
भारतीय तज्ञांनी सल्ला दिला आहे की, या परिस्थितीत घाबरण्याचे कारण नाही. कारण लोकसंख्येमध्ये गंभीर कोविड-१९ विरुद्ध प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान भारतातील लोकांमध्ये सौम्य संसर्ग होऊ शकतो. ज्यामध्ये सामान्य सर्दी किंवा फ्लू सारखी लक्षणे दिसून येतील. म्हणूनच कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झाल्यास लहान मुले, वृद्ध आणि पूर्वीपासून आरोग्य समस्या असलेल्यांचे वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे. वेळेवर आरोग्याच्या चाचण्या करून खबरदारीचे पालन करणे महत्वाचे ठरेल.
सध्या भारतात कोविड-१९ चा कोणताही असामान्य ट्रेंड आढळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील कोणत्याही नव्या चिंतेच्या विषाणूबाबत जागतिक इशारा दिलेला नाही. मात्र, सावध राहणे हे आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही चांगलेच आहे. भारतातील बहुतांशी लोकांनी लसीकरण केलेले आहेत त्यामुळे गंभीर आजारापासून आपण सुरक्षित आहोत. आपल्याला केवळ दुर्बल लोकसंख्येचे संरक्षण करणे आवश्यक आहे,” असे डॉ. सौमित्र दास यांनी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या माहितीत सांगितले आहे.
डॉ. सौमित्र दास हे वायरोलॉजिस्ट असून भारतीय विज्ञान संस्थेतील मायक्रोबायोलॉजी आणि सेल बायोलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि अध्यक्ष आहेत. तसेच, ते INSACOG (इंडियन सार्स-कोव्ह-२ जेनोमिक्स कन्सोर्टियम) सल्लागार मंडळाचे सह-अध्यक्ष आहेत. INSACOG ही कोविड-१९ विषाणूतील जेनोमिक बदलांचे परीक्षण करणारी ५० हून अधिक प्रयोगशाळांची एक नेटवर्क आहे.