China House Paint Technology Pudhari
आंतरराष्ट्रीय

Science News| एसीची गरज आता संपणार? शास्त्रज्ञांनी बनवला घर थंड ठेवणारा अनोखा रंग

Chinese paint: एसीची गरज आता संपणार? चिनी शास्त्रज्ञांनी बनवला घर थंड ठेवणारा अनोखा रंग

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : वृत्तसंस्था

वाढत्या उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी एअर कंडिशनवर अवलंबून राहण्याची गरज आता लवकरच कमी होऊ शकते. चीनमधील शास्त्रज्ञांनी एका अशा विशेष 'कूलिंग पेंट'चा (थंड ठेवणाऱ्या रंगाचा) शोध लावला आहे, तो उन्हाळ्यातही घरांचे तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यास मदत करेल. या अतिथंड कोटिंगचे व्यावसायिक उत्पादन आता चीनमध्ये अधिकृतपणे सुरू झाले आहे. इमारतींवर पडणारी उष्णता परावर्तित करून आतील जागा नैसर्गिकरीत्या थंड राखणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

हे कोटिंग केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून त्याची हेनान प्रांतातील एका कारखान्यात सलग सहा महिने चाचणी घेण्यात आली. चाचणीच्या निकालांनुसार, कोणत्याही प्रकारची वीज किंवा पारंपरिक शीतकरण घटकांचा वापर न करता हा रंग इमारतीमधील तापमान लक्षणीयरीत्या थंड ठेवू शकला. हे तंत्रज्ञान 'रेडिएटिव्ह कूलिंग' (उष्णता प्रारण शीतकरण) पद्धतीवर काम करते. यामध्ये इमारतीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन केले जाते आणि पृष्ठभागावरील उष्णता थेट अंतराळात उत्सर्जित केली जाते.

विजेचा वापर शून्य, पाण्याचा खर्चही वाचला

संबंधित कारखान्यामध्ये आतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पूर्वी पाण्याच्या स्प्रिंकलर प्रणालीचा वापर केला जात होता. मात्र, हे कोटिंग लावल्यानंतर पाण्याचा किंवा अतिरिक्त विजेचा वापर न करता तितकाच थंडावा मिळवणे शक्य झाले. चाचणी अहवालानुसार, हे तंत्रज्ञान केवळ व्यावसायिक इमारतींपुरते मर्यादित नसून सामान्य घरे, शाळा आणि सार्वजनिक इमारतींवरही सहज वापरता येऊ शकते.

दरवर्षी ६ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट

या विशेष रंगाची निर्मिती 'चायना स्टेट कन्स्ट्रक्शन इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' आणि 'हार्बिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' च्या तज्ज्ञांनी संयुक्तपणे केली आहे. पर्यावरणपूरक बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सुमारे ६,००,००० टन रंगाचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेतही हा रंग इमारती थंड ठेवण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या कोटिंगचे सरासरी आयुष्य तब्बल १५ वर्षे राहू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT