पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या शुल्क वाढीमुळे (Trump Tariffs) व्यापार युद्ध भडकले आहे. विशेषतः अमेरिका आणि चीनमधील व्यापार व्यवहारात अधिक तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण या दोन्ही देशांमधील व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकांनी फायदा होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान चीनमधील अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या भारतीय कंपन्यांना ५ टक्क्यांपर्यंत किमती कमी करण्याच्या ऑफर्स देऊ लागल्या आहेत. याचाच अर्थ असा आहे की येणाऱ्या काही दिवसात स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती भारतात कमी होऊ शकतात. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या मागणी वाढवण्यासाठी या सवलतीचा काही लाभ ग्राहकांना देऊ शकतात, असेही वृत्तात म्हटले आहे. भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांत वापर होणाऱ्या सर्व भागांपैकी सरासरी तीन-चतुर्थांश भाग चीनमधून आयात होतात.
अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापार युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. २ एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर एकूण ५४ टक्के शुल्क लागू करण्याची घोषणा केली. त्याला जशास तसे प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या आयातीवर ३४ टक्के शुल्क लादले. यानंतर लगेचच अमेरिकेने चीनवरील आयात शुल्क १०४ टक्क्यांपर्यंत वाढवून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यावर चीननेही अमेरिकेवर शुल्क वाढवून ते ८४ टक्के केले. यामुळे संघर्ष वाढला आहे.
चीन आणि अमेरिकेतील तीव्र व्यापार युद्धामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील या संघर्षात भारतीय कंपन्यांना फायदा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अधिक शुल्क लागू झाल्याने निर्यातदार कंपन्यांवर दबाव वाढला आहे. कारण त्यांना आता अमेरिकेतून कमी ऑर्डर मिळत आहेत. अशा परिस्थितीत, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना वाटाघाटी करण्याची संधी मिळू शकते. ते आता चीनमधून स्वस्त दरात वस्तू आयात करू शकतात. यामुळे मोबाईल, फ्रिज, टीव्ही या वस्तू स्वस्त होऊ शकतात.
सर्वसामान्यपणे इलेक्ट्रॉनिक्स उद्योग हा दोन ते तीन महिन्यांच्या कच्च्या मालाच्या साठवणुकीवर चालतो. कंपन्या मे-जूनपासून नवीन ऑर्डर देतील. जीटीआरआय (GTRI) च्या अलीकडील एका अहवालानुसार, भारताची आर्थिक वर्ष २४ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स घटकांची आयात मागील वर्षाच्या तुलनेत ३६.७ टक्क्यांनी वाढून ३४.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ही आयात गेल्या पाच वर्षांत ११८.२ टक्क्यांनी वाढली, असे वृत्तात पुढे म्हटले आहे.
एकमेकांवर शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लागू करण्यावरून व्यापार युद्धाचा भडका उडाला आहे. त्यानंतर विविध देशांकडून आलेल्या दबावानंतर ट्रम्प यांनी बुधवारी बहुतांश देशांसाठी ९० दिवसांकरिता शुल्क स्थगिती जाहीर केली.