Gold prices | ट्रम्प टॅरिफमुळे सोन्याच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या दर

'टॅरिफ'चा फटका; महागाईवाढीची चिंता वर्षभर राहणार
Gold prices
सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत.(AI Image)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १२५ टक्के प्रतिपूर्ती शुल्क लागू केल्यानंतर व्यापार तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सेफ हेवन अर्थात सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. ट्रम्प टॅरिफनंतर गुंतवणूकदार आता सराफा बाजाराकडे वळले असून गुरुवारी सोन्याच्या किमतीत एक टक्केहून अधिक वाढ झाली.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आज स्पॉट गोल्डची किंमत १.५ टक्के वाढून प्रति औंस ३,१२९.३३ डॉलरवर पोहोचली आहे. सोन्यासाठी ऑक्टोबर २०२३ नंतरचा हा सर्वोत्तम दिवस ठरला. तर अमेरिकन गोल्ड फ्यूचर्स २.२ टक्क्यांनी वाढून ३,१४५.८० डॉलर्सवर पोहोचले. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

ट्रम्प यांनी ९ एप्रिलपासून चीनवरील आयात शुल्क १०४ टक्के वाढवल्यानंतर, चीनने गुरुवार १० एप्रिलपासून अमेरिकेतून येणाऱ्या सर्व वस्तूंवर ३४ टक्क्यांऐवजी ८४ टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली. यामुळे दोन्ही देशांदरम्यान व्यापार युद्ध तीव्र झाले आहे.

"जर आम्ही मंद वाढीच्या टप्प्यात प्रवेश केला, जो आपला आधारभूत घटक आहे, तर आम्हाला वाटते की दर शेवटी कमी होतील आणि सोन्याला मागणी वाढेल. कारण टॅरिफच्या परिणामांमुळे महागाईवाढीची चिंता वर्षभर आपल्यासोबत राहील," असे मॅरेक्सचे विश्लेषक एडवर्ड मीर यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले.

Gold prices | सोन्याच्या दरवाढीमागील कारणे

जागतिक अनिश्चितता आणि महागाईवाढीपासून बचावाचे साधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोने दरात २०२५ मध्ये १८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणा, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा, मध्य पूर्व आणि युक्रेनमधील भू-राजकीय तणाव, मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी आणि सोन्याशी संबंधित एक्सचेंज-ट्रेडेड फंडांमध्ये वाढलेली गुंतवणूक ही सोने दर वाढीमागील कारणे आहेत.

भारतातही सोने पुन्हा तेजीत

भारतीय सराफा बाजारातही सोन्याच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,६११ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९०,१६१ रुपयांवर पोहोचला. याआधी सोन्याचा दर ८८,५५० रुपये होता. भू- राजकीय तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बुधवारी एमसीएक्स सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,७२४ रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा दर २,८५६ रुपयांनी वाढून प्रति किलो ९१,६०० रुपयांवर बंद झाला.

Gold prices
ट्रम्‍प 'टॅरिफ'चा चीनला मोठा झटका, 'युआन' १७ वर्षांच्या नीचांकी पातळीवर!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news