Operation Sindoor file photo
आंतरराष्ट्रीय

Operation Sindoor: भारत-पाक युद्धाला चीनने बनवले 'शस्त्र चाचणीचे मैदान'; अमेरिकेच्या अहवालाने खळबळ

'ऑपरेशन सिंदूर' संघर्षाचा चीनने आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी 'युद्ध चाचणीचे मैदान' म्हणून वापर केला. शस्त्रविक्रीसाठी चीनने भारत-पाकिस्तान युद्धाचा कसा घेतला फायदा?

मोहन कारंडे

Operation Sindoor

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' संघर्षाचा चीनने आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी 'प्रत्यक्ष युद्ध चाचणीचे मैदान' म्हणून वापर केला, असा धक्कादायक खुलासा अमेरिकेच्या एका महत्त्वपूर्ण अहवालातून झाला आहे. चीनने आपल्या संरक्षण क्षमतांची चाचणी घेण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानला शस्त्रांची मदत केली, असा दावा या अहवालात केला आहे.

मंगळवारी प्रकाशित झालेल्या यूएस-चायना इकॉनॉमिक अँड सिक्योरिटी रिव्ह्यू कमिशनच्या द्विपक्षीय वार्षिक अहवालात हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अहवालानुसार, चीनला आपल्या आधुनिक शस्त्र प्रणालींचा वास्तविक युद्धात वापर करण्याची ही पहिल्यांदाच संधी मिळाली. त्यामध्ये HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली, PL-15 हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि J-10 लढाऊ विमानांचा समावेश होता.

चीनने केले आपल्या शस्त्राचे मार्केटिंग

भारत-पाकिस्तान संघर्षानंतर चीनने त्वरित शस्त्रविक्रीच्या संधी साधल्या. अहवालानुसार, जूनमध्ये चीनने पाकिस्तानला ४० J-35 पाचव्या पिढीची लढाऊ विमाने, KJ-500 विमाने आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकण्याची ऑफर दिली. यानंतर काही आठवड्यांतच चीनी दूतावासाने या संघर्षात आपल्या शस्त्र प्रणालींना मिळालेल्या यशाचे कौतुक केले. या सर्व हालचालींचा स्पष्ट उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली शस्त्रविक्री वाढवणे हा होता.

राफेलला बदनाम करण्याचा प्रयत्न

अहवालानुसार, चीनने ऑपरेशन सिंदूर नंतर फ्रेंच राफेल लढाऊ विमानाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. फ्रेंच गुप्तचर माहितीनुसार, चीनने आपल्या J-35 च्या बाजूने फ्रेंच राफेलच्या विक्रीत अडथळा आणण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्यास सुरू केली. चीनने बनावट सोशल मीडिया खात्यांचा वापर केला. AI आणि व्हिडिओ गेमच्या फोटोंचा वापर करून चीनच्या शस्त्रास्त्रांद्वारे नष्ट केलेल्या विमानांचा खोटा मलबा दाखवला गेला.

चीनकडून आरोप फेटाळले

या संपूर्ण अहवालावर प्रतिक्रिया देताना चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले की, "तुम्ही ज्या तथाकथित आयोगाचा उल्लेख करत आहात, तो नेहमी चीनविरुद्ध वैचारिक पूर्वग्रह ठेवतो आणि त्याची कोणतीही विश्वासार्हता नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT