पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य महासत्तांमधील टॅरिफ वॉर आता आणखी पेटत चालले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तुंवरील टॅरिफ 145 टक्क्यांपर्यंत वाढविल्यानंतर आता चीननेदेखील अमेरिकन वस्तुंवर 125 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, अमेरिकेने पुन्हा टॅरिफ वाढवले तरीदेखील आम्ही याहून अधिक टॅरिफ लावणार नाही, असेही चीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढील निर्णयांकडे दुर्लक्ष करणार असल्याचेही चीनने म्हटले आहे. रॉयटरने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चिनी अर्थमंत्रालयाने म्हटले आहे की, "अमेरिकेने चीनवर असामान्यरित्या अधिक टॅरिफ्स लावलेली आहेत. या टॅरिफ्समुळे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापार नियमांचे उल्लंघन झालेले आहे. मूलभूत आर्थिक तत्त्वांचे आणि सामान्य समजुतींचेही उल्लंघन झालेले आहे. हे पूर्णपणे एकतर्फी आहे. ही दडपशाही आणि जबरदस्ती आहे."
मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, “जर अमेरिका चीनच्या हितावर गंभीर हल्ले करत राहिली, तर आम्ही ठामपणे प्रतिकार करू आणि शेवटपर्यंत लढू.”
तथापि, त्यांनी हेही स्पष्ट केलं की, जर अमेरिका पुढेही चिनी वस्तूंवर अतिरिक्त टॅरिफ लावत राहिली, तरी चीन याकडे दुर्लक्ष करेल आणि यापुढे कोणतीही प्रतिशोधात्मक पावले उचलणार नाही.
चीनकडून ही कारवाई व्हाईट हाऊसकडून चीनवर सातत्याने टाकल्या जाणाऱ्या दबावानंतर झाली आहे. चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा आयात भागीदार असल्यामुळे, त्याला विशेषतः अतिरिक्त टॅरिफच्या वाढीच्या निशाण्यावर ठेवण्यात आले आहे.
अमेरिका इतर देशांवरील टॅरिफ्स सुलभ करत आहे. सवलत देत आहे. पण, टॅरिफ्स वाढवून चीनला मात्र एकटे पाडण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे.
ट्रम्प यांनी टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली पण चीनला मात्र त्यातून वगळले.त्यामुळे चीनवर टॅरिफ सुरू झाले आहे. उलट चीनला आता 125 % पर्यंत टॅरिफ्सचा सामना करावा लागणार आहे.
अमेरिकेच्या या टॅरिफ हल्ल्यांवर आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युरोपियन युनियनला आवाहन केले होते की, त्यांनी चीनसोबत हातमिळवणी करावी आणि या एकतर्फी दडपशाही विरोधात एकत्र उभे राहावे.