वेस्टर्न थिएटर कमांडचे माजी कमांडर जनरल झाओ जोंगकी  File Photo
आंतरराष्ट्रीय

Galwan & Doklam Mastermind Sacked : डोकलाम, गलवान संघर्षात चिनी सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या जनरल झाओ जोंगकीची हकालपट्टी..."

चिनी लष्‍कराच्‍या सर्वोच्‍च नेतृत्त्‍वात मोठे फेरबदल सुरु

पुढारी वृत्तसेवा

Galwan & Doklam Mastermind Sacked : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चिनी लष्कराच्या सर्वोच्च नेतृत्वात सध्या मोठे फेरबदल सुरू आहेत. याअंतर्गत, 'पीपल्स लिबरेशन आर्मी'च्या (PLA) वेस्टर्न थिएटर कमांडचे माजी कमांडर जनरल झाओ जोंगकी यांना चीनच्या सर्वोच्च राजकीय सल्लागार मंडळातून हटवण्यात आले आहे.

झाओ जोंगकींचे CPPCC सदस्यत्व रद्द

सरकारी वृत्तसंस्था 'शिन्हुआ'ने दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मधील डोकलाम वाद आणि २०२० मध्ये भारतासोबत झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षावेळी चीनच्या लष्करी हालचालींवर झाओ यांचेच नियंत्रण होते. आता त्यांचे चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सचे (CPPCC) सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, त्यांना इतर दोन पदांवरूनही मुक्त करण्यात आले आहे. या निर्णयाचे कोणतेही कारण बीजिंगकडून देण्यात आलेले नाही, तसेच या माजी जनरलविरुद्ध कोणत्याही चौकशीची घोषणाही करण्यात आलेली नाही.

डोकलाम, गलवान संघर्षात झाओ यांनी केले होते पीएलएचे नेतृत्व

फेब्रुवारी २०१६ मध्ये पुनर्रचित वेस्टर्न थिएटर कमांडचे पहिले कमांडर म्हणून झाओ यांनी पदभार स्वीकारला होता. तिबेट आणि शिनजियांगसह भारताला लागून असलेल्या चीनच्या मोठ्या सीमेवर पीएलएच्या (PLA) कारवायांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या अत्यंत महत्त्वाच्या कमांडवर आहे.

डोकलामध्‍ये भारत आणि चीनचे सैन्य तब्बल ७२ दिवस आमनेसामने

२०१७ मध्ये डोकलाम येथे भारत आणि चीनचे सैन्य तब्बल ७२ दिवस आमनेसामने होते, तेव्हा झाओ जोंगकी कमांडर होते. भूतानच्या हद्दीतील परिसरात रस्ता वाढवण्याचा प्रयत्न चिनी सैन्याने केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यामुळे भारत-चीन-भूतान ट्रायजंक्शनजवळ भारतीय सैन्याला हस्तक्षेप करावा लागला होता.

LACमधील तणावावेळीही झाओ हेच होते कमांडचे प्रमख

२०२० मध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) तणाव वाढला, तेव्हाही झाओ हेच कमांडचे प्रमुख होते. या तणावाचे रूपांतर १५ जूनच्या गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षात झाले, ज्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. चीनने अधिकृतपणे पीएलएच्या केवळ चार सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली असली तरी, त्यानंतरच्या अनेक अहवालांनुसार चिनी सैन्याची जीवितहानी याहून खूप मोठी होती.

अमेरिकेच्या अहवालातही गलवान कारवाईचा झाओ यांच्याशी संबंध

एका अमेरिकी गुप्तचर अहवालात गलवानच्या कारवाईचा संबंध झाओ यांच्याशी जोडण्यात आल्यानंतर, या संघर्षातील त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 'एएनआय'ने २०२० मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या अहवालात म्हटले होते की भारताला "धडा शिकवण्यासाठी" झाओ यांनीच गलवान कारवाईला मंजुरी दिली होती. गुप्तचर अहवालातील माहिती असलेल्या एका अज्ञात सूत्राच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले होते की, चीन हा भारत आणि अमेरिकेसमोर दुबळा दिसणार नाही, हे दाखवून देण्याच्या उद्देशानेच ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, चीनने कधीही या अहवालाला अधिकृत दुजोरा दिला नाही आणि बीजिंगने झाओ यांच्या कथित भूमिकेचा स्वीकारही केलेला नाही.

लष्करातील मोठ्या कारवाईचा भाग म्हणून झाओ यांची हकालपट्टी

शी जिनपिंग यांच्या पीएलएवरील वर्चस्व वाढवण्याच्या आणि लष्करात सुधारणा करण्याच्या मोहिमेचा फटका आता वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना बसत आहे, त्यातूनच झाओ यांची हकालपट्टी झाली आहे. 'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, "शिस्त आणि कायद्याच्या गंभीर उल्लंघनाच्या" कथित आरोपांच्या चौकशीनंतर चीनने नुकतेच वरिष्ठ जनरल झांग युक्सिया आणि लिऊ झेनली यांना केंद्रीय लष्करी आयोगातून हटवले आहे.२०१२ मध्ये सुरू झालेल्या शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमुळे आतापर्यंत अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची चौकशी झाली असून काहींना बडतर्फ किंवा निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई आता थिएटर कमांड्स, लष्करी खरेदी विभाग आणि सशस्त्र दलांच्या इतर प्रमुख विभागांपर्यंत पोहोचली आहे.

'पीएलए'चे १०१ वरिष्ठ अधिकारी बडतर्फ

'सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज'च्या फेब्रुवारी २०२६ च्या अहवालानुसार, पीएलएच्या १०१ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे किंवा ते बेपत्ता आहेत. हे प्रमाण चीनच्या लष्करी नेतृत्व पदांच्या तब्बल ५२% इतके आहे. असे असले तरी, झाओ यांना पदावरून हटवण्याचा संबंध या मोठ्या कारवाईशी आहे किंवा त्यांची चौकशी सुरू आहे, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत संकेत मिळालेले नाहीत. त्यामुळे, भारतासारख्या संवेदनशील सीमेवर चीनच्या लष्करी रणनीतीत कधीकाळी केंद्रस्थानी असलेल्या एका माजी वरिष्ठ कमांडरची सीपीयसीसीमधून (CPPCC) झालेली हकालपट्टी, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT