Baloch Liberation Army File Photo
आंतरराष्ट्रीय

BLA attack Gwadar: बलूचिस्तानमध्ये BLA चा मोठा आत्मघाती हल्ला; पाकिस्तानचे ३० हून अधिक जवान ठार

बलूच लिबरेशन आर्मीने ग्वादरमधील जिवानी भागातील पनवान येथे असलेल्या पाकिस्तान कोस्ट गार्डच्या छावणीवर भीषण आत्मघाती हल्ला केला.

पुढारी वृत्तसेवा

BLA attack Pakistan Coast Guard camp

बलूचिस्तान: बलूच लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पाकिस्तानात मोठा रक्तपात घडवून आणला आहे. ग्वादरमधील जिवानी भागातील पनवान येथे असलेल्या पाकिस्तान कोस्ट गार्डच्या छावणीवर बीएलएने भीषण आत्मघाती हल्ला केला. 'द बलूचिस्तान पोस्ट'च्या वृत्तानुसार, या शक्तिशाली हल्ल्यात पाकिस्तानचे ३० हून अधिक जवान जागीच ठार झाले असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या धाडसी हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने अधिकृतपणे स्वीकारली आहे.

स्फोटकांनी भरलेला ट्रक थेट छावणीत घुसवला

शुक्रवारी संध्याकाळी 'बीएलए'च्या विशेष 'मजीद ब्रिगेड'ने हा हल्ला घडवून आणला. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:३२ च्या सुमारास अताउल्लाह बलूच ऊर्फ अजमल नावाच्या आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेला ट्रक कोस्ट गार्डच्या तळामध्ये घुसवला आणि काही सेकंदांतच संपूर्ण परिसरात प्रचंड मोठा स्फोट झाला.

लष्करी छावणीचे रूपांतर ढिगाऱ्यात

'बीएलए'चा प्रवक्ता जियांद बलूच याने अधिकृत पत्रक जारी करून या हल्ल्याची माहिती दिली. "या शक्तिशाली स्फोटामुळे पाकिस्तान कोस्ट गार्डची लष्करी छावणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून तिचे रूपांतर केवळ ढिगाऱ्यात झाले आहे," असा दावा प्रवक्त्याने केला आहे.

थरकाप उडवणारा व्हिडिओ जारी

'बीएलए'ची मीडिया विंग असलेल्या 'हक्कल'ने या हल्ल्याचा ४३ सेकंदांचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये स्फोटकांनी भरलेला ट्रक छावणीच्या परिसरात घुसताना आणि त्यानंतर काहीच क्षणात तिथे झालेला महाभयंकर स्फोट दिसत आहे. हल्ल्यानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये लष्करी इमारतीचा एक मोठा भाग पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

केवळ आत्मघाती स्फोट घडवूनच बलूच लढवय्ये थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी थेट छावणीत घुसून हल्ला केला. बीएलएने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या बॉम्बस्फोटानंतर त्यांच्या 'फतेह स्क्वाड' या रणनीतिक तुकडीने चौफेर हल्ला चढवला. छावणी उद्ध्वस्त झाल्यानंतर फतेह स्क्वाडच्या सैनिकांनी आत घुसून जिवंत राहिलेल्या कोस्ट गार्डच्या जवानांना लक्ष्य केले. दोन्ही बाजूंमध्ये आमनेसामने धुमश्चक्री उडाली, ज्यामध्ये ३० पेक्षा जास्त पाकिस्तानी जवान मारले गेले.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

"मलब्याखाली दबलेले सैनिक आणि जखमींची गंभीर अवस्था पाहता पाकिस्तानी सैनिकांच्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे," असे बीएलएच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तसेच या मोहिमेची सविस्तर माहिती लवकरच अधिकृत चॅनेलवरून प्रसिद्ध केली जाईल, असेही सांगण्यात आले. तसेच, पाकिस्तानला 'बीएलए'ने इशारा दिला आहे की, "जोपर्यंत बलूचिस्तानच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे आमचे अंतिम ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानी सुरक्षा दलांना लक्ष्य करणारी आमची ही सशस्त्र मोहीम सुरूच राहील."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT