प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
आंतरराष्ट्रीय

Biological smuggling | जैविक पदार्थांची तस्करी, चीनच्‍या महिला संशोधकास अमेरिकेत अटक

'एफबीआय'ची डेट्रॉइट मेट्रोपॉलिटन विमानतळावर कारवाई, सलग दुसर्‍यांदा कारवाईने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Biological smuggling : परदेशातून हानीकारक बुरशीची तस्करी केल्याप्रकरणी चीनमधील वुहानमधील संशोधक असलेल्या चीनमधील पीएच.डी. विद्यार्थीनी चेंग्झुआन हॅन हिला अमेरिकेत अटक करण्‍यात आली आहे. डेट्रॉइट मेट्रोपॉलिटन विमानतळावर अमेरिकेची एक प्रमुख तपास संस्था 'एफबीआय'ने ही कारवाई केली. जैविक पदार्थांच्‍या तस्करी प्रकरणी गेल्‍या आठवड्यात दोघांना अटक करण्यात आली होती.

जैविक तस्‍करी प्रकरणी चीनमधील संशाेधकांवर सलग दुसरी कारवाई

या प्रकरणी 'एफबीआय'चे संचालक काश पटेल यांनी 'एक्स' पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "डेट्रॉइटमध्ये आणखी एका चिनी नागरिकाला जैविक साहित्याची तस्करी आणि खोटी माहिती दिल्‍या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. चेंग्झुआन हॅन ही वुहान येथील पीएच.डी. विद्यार्थीनी आहे. काही दिवसांपूर्वी याचप्रकारच्या आरोपांवर चीन मधील दाेघा संशाेधकांना अटक करण्‍यात आली हाेती.

संशोधकाने पाठवलेले पदार्थ विशिष्‍ट बुरशी संबंधित

या कारवाईविषयी माहिती देताना 'एफबीआय'ने म्‍हटलं आहे की, अटक करण्यात आलेली चिनी संशोलक वुहानमधील हुआझोंग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात पीएचडी करतआहे. मिशिगन विद्यापीठात ती एक वर्ष संशोधन करणार होती. तिच्‍यावर काही महिन्यांपूर्वी मिशिगन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना जैविक पदार्थ पाठवल्याचा आरोप आहे. एफबीआयने या प्रकरणात न्यायालयात स्‍पष्‍ट केले आहे की, चेंग्‍झुआन हॅनने पाठवलेली जैविक पदार्थ हा विशिष्ट प्रकारच्या हानीकारक बुरशी संबंधित आहे. यासाठी सरकारी परवानगी आवश्यक आहे. दरम्‍यान,अमेरिकेतील फेडरल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हॅनवर परोपजीवी गोल कृमी ( राउंडवर्म) संबंधित जैविक साहित्य अमेरिकेत बेकायदेशीररित्या आणल्याचा आणि या प्रकरणी खाेटी माहिती दिल्याचा आरोप आहे. हे दोन्ही गुन्हे फौजदारी स्वरूपाचे असून गंभीर मानले जातात.

महिला चीन संशोधकावर कोणते आरोप?

चीनी संशोधन हॅनने चीनहून मिशिगन विद्यापीठातील संपर्कांना चार पॅकेजेस पाठवली होती. या पॅकेजेसमध्ये परोपजीवी गोल कृमी ( राउंडवर्म) संबंधित जैविक साहित्य होते. अमेरिकी कायद्यानुसार हे साहित्य नियंत्रित श्रेणीत येते. त्यासाठी विशेष आयात परवाना आवश्यक असतो. हॅनने तस्‍करीचे एक पॅकेज पुस्तकात लपवून पाठवले होते. तिने तपासातही अडथळ आणण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचा आरोप एफबीआयने केला आहे. दरम्‍यान, अमेरिकेत गेल्या १० दिवसांत जैविक सामग्रीच्या तस्करीशी संबंधित हा दुसरा खटला आहे. गेल्या आठवड्यात मिशिगनमध्ये चीनमदील दोन संशोधकांवर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. अमेरिकेत धोकादायक बुरशीची तस्करी प्रकरणी त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे. या दोघांवरही अमेरिकेत कृषी दहशतवाद पसरवल्याचा आरोप आहे.

यापूर्वी अटक करण्‍यात आलेल्‍या चिनी नागरिकांवर कोणते आरोप ?

यापूर्वी मिशिगनमध्ये दोन संशोधकांवर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. अमेरिकेतील मिशिगनमध्‍ये यापूर्वी दोन चिनी नागरिकांवर जैविक तस्‍करी प्रकरणी आरोप निश्‍चित करण्‍यात आले आहेत. युनकिंग जियान (३३) आणि जुन्योंग लिऊ (३४) अशी त्‍यांची नावे आहेत. त्‍यांच्‍यावर जैविक पदार्थांची तस्करी, खोटी माहिती देणे आणि व्हिसा फसवणूक केल्याचे आरोप आहेत. न्याय विभागात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की दोन्ही चिनी नागरिक अमेरिकेत एका विशेष प्रकारची बुरशी आणण्याचा कट रचत होते, ज्यामुळे पिकांमध्ये 'हेड ब्लाइट' नावाचा एक विशेष प्रकारचा रोग पसरू शकतो.

जैविक पदार्थांच्‍या तस्‍करीमुळे मोठा धोका

जैविक पदार्थांची तस्‍करी म्‍हणजे सरकारची परवानगी न घेता विषाणू, जिवंत सूक्ष्मजीव (बॅक्टेरिया), डीएनए व अन्‍य जैविक घटक लपवून किंवा चुकीची माहिती देऊन एका देशातून दुसऱ्या देशात नेणे. अशा प्रकारच्‍या तस्‍करीमध्‍ये आजार पसरवण्‍याचा धोका (उदा. कोरोना, झिका व्‍हायरस)असतोच. त्‍याचबरोबर जैविक शस्त्र वापरण्याचा धोका असून यामुळे शेती, अन्नसाखळी, पर्यावरण यांना हानी पोहोचण्याची शक्यता असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT